आपला देश बहुभाषी आहे. त्या सर्वात जर भावनिक एकता साधायची असेल, तर एकमेकांच्या भाषा अवगत असणे जरुरी आहे. विविध भाषा येत असतील तर उत्तमच! पण कमीतकमी सर्वत्र सर्वाधिक समजली जाणारी हिंदी चांगली येणे आवश्यक ठरते.

जेव्हा अऱ्हिंदी व्यक्ती हिंदीत बोलते, तेव्हा ती त्याच्या त्याच्या ढंगाने बोलणार हे उघडच आहे.  हिंदी भाषिकांनी हे समजून घेऊन अऱ्हिंदी भाषिकास त्याचा झालेल्या चुकांसंबंधात न हासता, त्याला उत्तेजनच द्यायला हवे. (हीच गोष्ट जेव्हा अ-मराठी, मराठी बोलतात तेव्हा ही लागू होते!) परक्या भाषेत बोलणाऱ्याने सुद्धा मूळ बोली योग्य रितीने कशी बोलता येईल याचा विचार करायला हवा. तसा प्रामाणिक प्रयत्न हवा.

भाषा-भाषांचा द्वेष, वृथा दुराभिमान परवडणारे नाहीत.

महाराष्ट्रात येणाऱ्या पर-प्रांतियांना मराठी शिकवण्याची जबाबदारी आपलीच असते. जो पर्यंत आपण त्यांच्याशी (मोडक्या- त्सोडक्या) इंग्रजीत अथवा हिंदीत बोलत राहता, तो पर्यंत त्यांना मराठी ऐकण्याची संधी मिळणार नाही! आणि भाषा श्रवणभक्तीनेच येते हे सत्य आहे.

या निमित्ताने एक गोष्ट मांडावीशी वाटते- आमच्याकडे बहुभाषित्वाला उत्तेजन देण्याची काही चांगली योजना नाही! ना शासकीय पातळीवर, ना बिगर शासकीय पातळीवर. बहुभाषिकत्वाचा गौरव करण्यासाठी एखादा पुरस्कार सुरू करता येईल?