या संमेलनाला अनेक व्यासपीठांवरून विविध कारणांनी विरोध झालेला आहे. महाराष्ट्रातून होणारा विरोध तर सोडा , अमेरिकेतून ( ज्या देशात हे संमेलन आहे )महाराष्ट्राला दरवर्षी कोत्यावधीची देणगी पाठवणारी महाराष्ट्र फाउंडेशन सारखी संस्था , अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर आणि प्रायोजित करणारी कॅलिफोर्नियातली (जेथे हे संमेलन आहे )"कला" नावाची संस्था यांनी देखील जाहीर विरोध केला आहे. ही आजची गोष्ट नव्हे. यापैकी कुठल्याही आघाडीवर, देवकूळे आणि पार्टीने संवाद साधला आहे, आरोपांचे खंडन केले आहे, काही सफाई दिली आहे असे माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकास माहिती नाही.
ज्या मराठी लोकांकरता हे संमेलन करायचे त्या लोकांकरताचे उत्तरदायित्त्व संमेलनकर्त्यानी धाब्यावर बसलेले आहे. माझी स्मृती मला दगा देत नसेल तर, २६ नव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यानंतर रत्नागिरीचे संमेलन रद्द झाले. सॅन होजे वाल्यानी इथेदेखील कोळून प्यालेली दिसते.
संमेलनकर्त्यांपेकी कुणी कुठल्याही व्यासपीठावर येऊन काही एक भूमिका, काही मुद्देसूद उत्तरे देण्याची अपेक्षा व्यर्थ आहे हे तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
थोडासा ठोकताळा करायचाच झाला तर :
साहित्य संमेलन अमेरिकेला होते हे चांगले का? अशा प्रकारचा पायंडा पडणे योग्य का? : हो.
देवकुळे आणि कंपणीने हे मिशन एका स्वयंसेवी आणि विश्वस्त भूमिकेतून केले असल्यास त्यांच्या उपक्रमशीलतेची, श्रमांची, प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे का? : हो
मात्र हे करताना या मंडळींनी अनेकविध पातळ्यांवरचा विधिनिषेध, उत्तरदायित्व यांचे दर्शन घडवले असे म्हणता येईल का? : मोठ्या प्रमाणावर सांगायचे, तर नाही.
याकरता २५ लाख रुपये बुडीत खात्यातल्या महाराष्ट्र सरकारकडून घेतले असले तर ते बरोबर का? : नाही.
२६ नव्हेंबरच्या घटनानंतर, जेव्हा या संमेलनाचे भावंड रद्द केले जाते तेव्हा हे संमेलन भरवणे योग्य का? नाही.
तेव्हा, माझ्या दृष्टीने, गोळाबेरीज करताना, अनिष्ट बाबींचे पारडे वरचढ ठरते असे दिसते.
आता संमेलन होणार हे तर अटळ आहे. मग देवकुळे नि कंपनीला थोडेसे परिमार्जन कसे करता येईल?
- २५ लाख रुपये परत देणे (घेतले असल्यास! ). किंवा त्याचा विनियोग महाराष्ट्रात समाजोपयोगी कार्याला करणे.
- संमेलनाचे सूप वाजल्यानंतर तरी, कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावर काही स्पष्टीकरणे देणे.
- संमेलनातून काही आर्थिक फायदा झाला असेलच तर, साहित्योपयोगी/समाजोपयोगी कार्याला हे पैसे देणे.
(काही भाग संपादित : प्रशासक)