माध्यमांची फसवाफसवी, रिऍलिटी शो चे निकाल आणि ते लावण्याच्या पद्धती हे मुद्दे वेगळे, त्यात शिरण्यात अर्थ नाही. रात गयी बात गयी ह्याच्याशी सहमत आहेच.
तसेच शुभामोडक यांनी सांगितलेला थेट प्रक्षेपणासंबंधीचा प्रकार ही फसवाफसवी नाही. ते प्रक्षेपणाचे एक तंत्र आहे. मराठी शब्द माहीत नाही, इंग्रजीत त्याला Differed live telecast असे म्हणतात. घडलेला प्रसंग काहीश्या विलंबाने पण नेहमीप्रमाणे पूर्वचित्रित न करता दाखवला जातो. कालच्या कार्यक्रमाच्या प्रायोजकांच्या जाहिराती प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या. त्यांना जागा देण्यासाठी आणि टी. आर. पी. चं गणित सांभाळण्यासाठी अश्या प्रकारचे प्रक्षेपण करणे ही फसवाफसवी ठरू नये. मात्र, दूरदर्शनचा आदर्श घेण्यासारखा आहे. असे प्रक्षेपण असेल तर ते Differed Live असं नीट जाहीर करतात. तसं काही झी ने केलेलं नव्हतं. ते करायला हवं होतं.
प्रत्यक्ष गायनाविषयी बोलायचं झालं तर कार्तिकीची निवड मला चुकीची वाटत नाही. कारण :
१) गोऽऽऽऽड नसला तरी दमदार आणि जवारीदार आवाज. (हे आवाजाचं देणं सगळ्यांकडे वेगवेगळं आणि छान होतं)
२) पक्का सूर आणि ताल. (रोहित मुख्य कमी पडला तो इथे)
३) थोडेसे ग्रामीण वळणाचे पण स्वच्छ उच्चार. (रोहितच्या उच्चारांबाबत सूचना आपण ऐकलेल्या आहेतच)
४) खर्जात / टिपेत काळजाला हात घालणारा सूर. (अलिकडे प्रथमेशचा आवाज खर्जात ऐकवत नव्हता.आणि टिपेला थोडा चिरकत होता. आर्याला खर्जाच्या रियाजाची गरज आहे हे वारंवार सांगितलं जात होतं. रोहितचा इथे प्रश्नच येत नाही.)
५) शास्त्रीय संगीताची चांगली बैठक. (प्रथमेश आर्या यांचीही होती अर्थात)
६) बहुविध गाणी गाण्याची क्षमता. (प्रथमेश इथे कमी पडला. ही क्षमता प्रत्येक गायकात असलीच पाहिजे असं माझं मत अजिबात नाही. पण स्पर्धेच्या चौकटीत ती महत्त्वाची ठरते हेही नाकारून चालत नाही.)
७) काहीशी अपरिचित / विस्मृतीत गेलेली गाणी गाऊन नव्याने / पुन्हा लोकप्रिय करण्याची क्षमता. (प्रथमेश, आर्या, रोहित यांपैकी कुणीही कार्तिकीइतक्या प्रमाणात हे केलं नाही.)
८) लोकसंगीतावरील विशेष प्रभुत्व. (आर्या थोडी कमी इथे पडली. लावणी गाते पण लोकसंगीताचे इतर प्रकार तिने नाहीच हाताळले जवळजवळ. प्रथमेश ठीक होता याबाबतीत पण कार्तिकी वरचढच होती.)
९) आपली गाणी प्रभावीपणे सादर करण्याची कला. (त्यात तालासुराचाही आणि सादरीकरणाचाही असा दुहेरी प्रभाव पाडणारी ती एकटीच होती.)
१०) आत्मविश्वास. (सगळ्यांनाच होता)
मी परीक्षक असते तर प्रथमेशला विजेता केलं असतं कदाचित. पण आता विचार करताना कार्तिकीची झालेली निवड योग्य आहे असंच वाटतंय.