ही चर्चा अजून चालूच आहे हे पाहून आश्चर्य वाटले. मजाही वाटली.
ज्या मुलींच्या कपड्यांविषयी चर्चा चालू आहे, त्या ही बघण्याची शक्यता अगदी थोडी. असो.
मला समजलेले मुद्दे व माझी मते -
१. आखुड सदरा घातल्याने पार्श्वभाग दिसतो. काहींचे मत हे दृश्य ओंगळवाणे आहे असे आहे, तर काहीचे हे कामुक आहे असे आहे. म्हणजेच बघणाऱ्याला काय वाटेल यावर सदर मुलीचा काहीच ताबा नाही.
२. पुरूष ज्वालाग्रही पदार्थ, स्त्री ठिणगी. यात स्त्रीने ठिणगी व्हावे की नाही हे (योग्य तो पेहराव करून) ठरवावे. मग पुरुषाने स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याची काही सोय नाही का?
३. आकर्षक वेशभूषा करणाऱ्या स्त्रीचा एकमेव उद्देश समस्त पुरुषवर्गाला कामदृष्टीने उद्दिपित करणे हा असतो असा (मुख्यत्वे पुरुषवर्गाचा) (गैर)समज आहे असे दिसते. जोवर मुलगे आपल्या मातेला/ आजीला अश्या आकर्षक वेशात नेहमी पाहतील अशी वेळ येत नाही तोवर हा समज तसाच राहील. काळ हेच यावर उत्तर.
भूषण यांचा मुख्य मुद्दा होता की अश्या वेशभूषेचा उद्देश काय, छोटा सदरा घालून दरेक मिनिटाने तो खाली ओढण्यात काय 'फॅशन' आहे?
मुख्यत्वे माणसाच्या कपड्यांचा उद्देश बहुतांशी जमावासारखे पण थोडे वेगळे दिसावे असा असतो. म्हणजे 'बाहेरच्यांना' सारखे तर आपल्या गटातल्यांना खास दिसावे असा. हल्ली पुष्कळ मुली असे छोटे सदरे घालतात. लांब सदऱ्यांची पद्धतही अधून मधून येत असते. तसेच वर आणि खाली बांधण्याच्या तुमानी वगैरे. साध्या भाषेत म्हटले तर 'पीअर प्रेशर' - आपल्या गटातील इतर लोक करतात तसे करावेसे वाटणे/ करावे लागणे. तर हल्लीची पद्धत, सगळे करतात म्हणून, मुलींना छोटे सदरे घालावे तर लागतात, पण मग दुचाकीवर बसल्यावर सदरा वर तर गेला नाहीना अशी काळजीही वाटते. त्यातून मग सारखे सारखे खाली ओढत राहण्याची सर्कस करावी लागते. त्यात जाणीवपूर्वक कोणते भाग दाखवावे/ कोणाला आकर्षित करावे/ लाजवावे असा काही उद्देश नसतो. केवळ इतरांसारखे वागावे इतकाच मुद्दा असतो.
उंची अंतर्वस्त्रांचे प्रदर्शन करण्याची फॅशन सध्या इथे इंग्लंडात दिसते, त्याविषयी बीबीसीवर एक लेख वाचला होता. त्यातही असेच सांगितले होते की असली फॅशन अगदी कर्मठ कालखंडातही छुप्या पद्धतीने येऊन गेली होती. आपल्याकडे मात्र अजून ही फॅशन आलेली नाही असे वाटते.