असे कसे ताई, अमेरिकेत आत्ता थंडी बर्फ वगैरे असेल त्यामुळे बाहेर खेळायला जाणे शक्य नसेल हे समजू शकते. पण मुलांना घरी जमवायला पुढाकार घ्या. जे काही खेळ घरातल्या जागेत खेळता येतील असे त्यांना शिकवा. लपाछपी, खजिनाशोध, उड्यांची स्पर्धा, दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा, रोल प्ले, यासारखे खेळ घरात खेळता येऊ शकतील. मुलांना एकत्र येऊन शारीरिक ऍक्टिव्हिटी करून मजा करता येते याची जाण करून द्या. आजकालच्या मुलांना या जाणीवेचीच गरज आहे.
खरंच थोडा वेळ मुलांना देऊन आपल्या लहानपणीचे खेळ शिकवले तर तीही रस घेतील. त्यांना काँप्युटरवर तेच तेच खेळून कंटाळा येतोच की. मग भुणभुण करतात नव्या खेळासाठी. वेळ देण्यापेक्षा आपल्यालाही नव्या गेमची सीडी देणं सोपं असतं बरेचदा मग ते दुष्टचक्र चालूच राहतं.
सर्वदमन, खेळताना लागलं तर ही भीती पण पालकांच्या भीतीचाच एक प्रकार आहे. बरेचदा जेव्हा संध्याकाळी मुलांनी खेळणं अपेक्षित असतं तेव्हा पालक कार्यालयात असतात. आजी आजोबा बरेचदा सोबत राहत नसतात. शेजारच्या सगळ्या घरांतही थोड्याफार फरकाने तीच कथा असते. मग खेळताना मूल पडलं त्याला लागलं तर कोण बघणार? पुन्हा जास्त लागलं तर त्याची शाळा बुडणार, मग ते मागे पडणार, त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला रजा घेऊन राहायचं म्हटलं तर ते शक्य कसं होणार? हा विचार पालक करत नाहीत का? करतातच. मग ती भीती मुलांना वाटली तर त्यात नवल काय?
एरव्हीचं जाऊदे. पण निदान आपल्या सुट्टीच्या दिवशी तरी मुलांना घेऊन खेळावं स्वतः. वेगवेगळे खेळ शिकवावे. मुलांना प्रथमोपचार घ्यायला शिकवावे. म्हणजे छोटं मोठं लागलं तर मुलं घाबरून जाणार नाहीत. आणि खेळतील. मित्र मिळवतील. सोपं नाहीये, पण हा प्रयत्न करायला काय हरकत आहे?