ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे केव्हापासून मनात आहे. निवांत वेळ मिळत नव्हता. शेवटी म्हटलं जसं जमेल तसं छोट्या छोट्या भागांत उत्तर देऊ. पहिला भाग हा घ्या.

मारुतिस्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि करावी अशी शिकवण दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत.

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती

भीमरूपी = प्रचंड मोठा दिसणारा,

महारुद्रा = रुद्र म्हणजे शंकराचा मारुती हा अवतार मानला आहे. त्याचप्रमाणे उग्र स्वभावाचा भयंकर असाही अर्थ होऊ शकतो.

वज्रहनुमान = ज्याची हनुवटी बज्राघात सहन करूनही वज्रासारखी अभेद्य आहे असा. मारुतीने जन्मल्या जन्मल्या फळ समजून सूर्याला गिळायला झेप घेतली तेव्हा अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला तो त्याच्या हनुवटीवर लागला आणि त्याने मूर्च्छित होऊन हनुमान परत पृथ्वीवर आला अशी आख्यायिका आहे. त्या प्रसंगापासून त्याला हनुमान / वज्रहनुमान अशी नावे प्राप्त झाली.

मारुती = मारुती हा वायुदेवाचा = मरुत् देवाचा मुलगा. वडिलांच्या नावावरून त्याला पडलेले नाव मारुति. वायुपुत्र असल्याने तो प्रचंड वेगवान होता. पण त्याचा उल्लेख अधिक स्प्ष्टपणे पुढे येतोच स्तोत्रात.

वनारी अंजनीसूता महादूता प्रभंजना

वनारी = वनारि असा मूळ शब्द आहे. आपल्या प्रचंड बळाच्या जोरावर वनेच्या वने समूळ उपटणारा म्हणून वनाचा शत्रू = वनारि.

अंजनीसूत = अंजनीसुत असा मूळ शब्द आहे. अंजनी हे मारुतीच्या आईचे नाव. तिचा मुलगा = अंजनीसुत.

वानरी अंजनीसूता असा पाठ असण्याचीही शक्यता आहे. वृत्ताच्या दृष्टीने विचार करता तो अधिक योग्य आहे. वानर वंशाच्या अंजनीचा मुलगा असा त्याचा अर्थ होतो. वानर असा शब्द स्तोत्रात कसा असेल असे काहींना वाटते. पण तो एक वंश आहे आणि स्तोत्रांमधून असे वंशाचे उल्लेख सर्रास सापडतात. वानर ह्या शब्दाचा अर्थ माकड हा गमत्या प्राणी असा इथे अभिप्रेत नाही.

महादूत = Royal Ambassador  असं म्हणता येईल. रामाचा सर्वात महत्त्वाचा दूत. दूत म्हणजे साधा निरोप्या नव्हे. राजाचा परराज्यातील प्रवक्ता / वकील असं म्हणता येईल.

प्रभंजन = बळाच्या जोरावर मोठ विनाश घडवून आणू शकतो असा.

या दोन ओळींत मारुतीचे आईवडील कोण, त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्याचे बळ किती मोठे आहे, देव असलेल्या रामाचा भक्त म्हणून नव्हे तर राजा असलेल्या रामाचा एक अधिकारी म्हणून त्याचे काय महत्त्व आहे, त्याचा स्वभाव कसा आहे अशी माहिती आपल्याला मिळते.