महाबळी प्राणदाता सकळां ऊठवी बळें

महाबळी = प्रचंड बलवान

प्राणदाता =  प्राण देणारा. हा उल्लेख संजीवनी मुळी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवल्याच्या प्रसंगाशी निगडित आहे.

सकळां ऊठवी बळें = जो आपल्या बळाच्या जोरावर सगळ्यांना उठवतो = हादरवून सोडतो.

सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका

सौख्यकारी = सुख देणारा

दुःखहारी = दुःखाचा नाश करणारा

दूत = रामाचा दूत. याविषयी सविस्तर आधी सांगितलेच आहे.

वैष्णवदायका = राम हा विष्णूचा अवतार = वैष्णव. मारुतीच्या उपासनेने त्याचा स्वामी असलेल्या रामाचीही कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैष्णवदायक चा अर्थ इथे "विष्णूचा अवतार असलेल्या रामाची कृपा मिळवून देणारा" असा होतो.

दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा

दिनानाथा = दीनानाथ असा मूळ शब्द. वृत्ताच्या सोयीसाठी दिनानाथ असा केला आहे. अर्थ - गोरगरिबांचा, दीन भक्तांचा वाली.

हरीरूपा = हरी = विष्णू = राम. त्या रामाचेच जणू एक रूप मारुती आहे अशी कल्पना केली आहे.

सुंदरा = सुंदर, देखणा (पुरुषाचे शरीर सौष्ठवपूर्ण, कमावलेले असले म्हणजे तो देखणा असतो हा संकेत इथे महत्त्वाचा आहे. मारुतीचे शरीर बळकट पिळदार होते असे सांगायचे आहे.)

जगदंतरा = जगदंतर म्हणजे परलोक. मारुती पारलौकीक आहे असे म्हणायचे आहे.

पातालदेवताहन्ता भव्य सिंदूरलेपना

पातालदेवताहन्ता = पाताळातल्या दुष्ट शक्तींचा विनाश करणारा

भव्य = देहाने भव्य

सिंदूरलेपना = सर्वांगाला शेंदराचा लेप दिलेला. मारुतीच्या मूर्तीला शेंदूर लावतात. म्हणून असे म्हटले आहे.

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना

लोकनाथा = नाथ म्हणजे आश्रयदाता, पालक. लोक म्हणजे जग. जगाचा पालक

जगन्नाथा = जगाचा पालक

प्राणनाथा = प्राणांचा म्हणजे जीवनाचा रक्षक. बलवान निरोगी शरीर दीर्घायू होते. आणि शरीर बलवान होण्यासाठी मारुतीची पूजा करावी हा संदर्भ इथे लक्षात ठेवावा.

पुरातना = पुरातन म्हणजे प्राचीन. हनुमान प्राचीन काळापासून आजतागायत अस्तित्वात आहे अशी श्रद्धा आहे. तो चिरंजीव = अमर आहे असे मानले जाते. त्या संदर्भात त्याला प्राचीन म्हटले आहे.

पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका

पुण्यवंता = पुण्यवान

पुण्यशीला = ज्याचे नित्य वर्तन हे पुण्यकर्मच असते असा.

पावना = पवित्र

परितोषका = आनंददायक