इंडिया(मूळ उच्चार इन्डिअऽ) हे नाव फार फार प्राचीन आहे. इसवी सनापूर्वी, ज्यावेळी इंग्लंडमध्ये रानटी माणसे राहात होत होती, त्याही वेळी आपला देश इंडिया या नावाने ओळखला जात असे.  त्यामुळे इंग्रजांनी किंवा पाश्चात्य लोकांनी देशाचे नाव बदलून इंडिया केले याला काहीच आधार नाही. अजूनही आपल्या देशाला अन्यत्र इंडी किंवा इंडियेन या नावांनी ओळखले जाते. एका देशाला अनेक नावे असू शकतात. आर्यावर्त, कार्मुक संस्थान, कूर्मसंस्थान, कुमारीद्वीप, अजनाभ वर्ष, भारत, भारतवर्ष, हिंद, हिंदुस्तान/हिंदुस्थान, इंडिया, इंडी. ही सर्व नावे आपल्याच देशाची आहेत. यातले हिंदुस्तान हे नाव भारताच्या उत्तर भागाला मोंगलांनी दिले. या नावांतली कुमारीद्वीप, इंडी आणि इंडियेन ही नावे वापरात आहेत.