१) सिंधू पासून हिंदू शब्दाची व्युत्पत्ती सर्वज्ञात आहे. थोडंसं स्तान आणि स्थान याविषयी.........
हिमालय, विद्यालय, कार्यालय वगैरे शब्द पाहा.
यात हिम/विद्या/कार्य + आलय असे भाग आहेत.
हिमाचे/विद्येचे/कार्याचे स्थान / घर असा त्याचा अर्थ आपल्याला माहितच आहे.
येथे आलय शब्द ज्या अर्थाने वापरलेला आहे, त्याच अर्थाने फारसी उर्दू भाषेतील समासात स्तान शब्द आढळतो. संस्कृतातील स्थान शी त्याचे उच्चारातील साम्य हा सामान्य योगायोग नाही.
मंगोल वंशाच्या पूर्व युरोप आणि पश्चिम आशियायी लोकांच्या (मोंगल/मुघल) फारसी-तुर्की भाषेत आणि संस्कृतात उच्चारदृष्ट्या अनेक साम्यस्थळे आहेत. कारण या सर्व भाषांचे कुळ एक आहे. या कुळाच्या मूळ भाषेला इंडोयुरोपिअन (भारोपीय) असे म्हणतात. या भागात स्तान शब्द अनेक राष्ट्रांच्या नावात असलेला दिसतो. उदा. कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कस्तान वगैरे. आर्य मध्य युरोपातून भारतात पोहचेपर्यंत भाषेत जे अनेक लहान मोठे बदल झाले, त्यांपैकी स्तान चे स्थान होणे हा बदल तुलनेने नगण्यच म्हटला पाहिजे. अर्थदृष्ट्या दोन्ही एकच आहेत.
दुसरं असं की संस्कृतातून सोप्या होत उत्तर भारतात ज्या प्राकृत भाषा निर्माण झाल्या त्यांच्यावर मुघल आक्रमणांनंतर फारसी भाषेचा प्रभाव पडून इ. स. ९-१० व्या शतकात उर्दूचा विकास झालेला आहे.उर्दू ही अधिक भारतीय वळणाची असलेली तुलनेने नवी भाषा आहे. तिने भारताला कोणतंही नवं नाव देण्याचा प्रश्न येत नाही. हिंदुस्तान हा शब्द उर्दूच्या निर्मितीपूर्वीपासून फारसी अरबी भाषांमध्ये प्रचलित होता. तो उर्दूने स्वीकारला होता.
भाषाभिमानी हिंदी भाषकांनी त्याचं हिंदुस्थान असं संस्कृतीकरण केलं इतकंच. त्याने हिंदुस्तान बरोबर आणि हिंदुस्थान चूक असं मात्र होत नाही. हिंदुस्तान आधी आणि हिंदुस्थान नंतर एवढंच काय ते खरं आहे.
हिंदुस्थान असं केल्याने तो शब्द संप्रदायवादी झाला असं मात्र मुळीच नाही. सिंधू नदीच्या खोऱ्याचा / त्या नदीवर अवलंबून असलेला / त्या नदीच्या पलीकडचा प्रदेश असा तो स्थानवाचकच राहिला. फाळणीच्या राजकारणापासून ह्या शब्दाला सांप्रदायिक, धार्मिक महत्त्व आलं. म्हणून देशाचं अधिकृत नाव स्वीकारताना हिंदुस्ता/स्थान ऐवजी भारत असं स्वीकारलं असणार हे बऱ्यापैकी स्पष्ट आहे.
२) प्रियालीच्या (आपण इंडू का नाही? ) या प्रश्नाचं उत्तर हे घ्या...
इंडस हा शब्द मूळ इंडोग्रीक भाषेतल्या इंडुस या शब्दापासून निर्माण झालेला आहे. सिंधूपासून हिंदूची व्युत्पत्ती आपण जाणतो. निखिलने उल्लेख केल्याप्रमाणे सिथियन, पार्थियन हे ग्रीक वंशाचे राजे भारताकडे सरकत असताना जेव्हा अफगाणिस्तान, पाकिस्तान प्रदेशात आले तेव्हा तेथील लोक या नदीच्या प्रदेशाला हिंदू म्हणतात हे त्यांना कळलं तो उच्चार त्यांना जसाच्या तसा करणं शक्य नव्हतं त्यामुळे त्याचं इंडू झालं. मात्र लॅटीन वंशाच्या ग्रीक भाषेत उकारांत पुंलिंगी शब्दांची संख्या फार नाही. ग्रीक भाषेतले पुंलिंगी शब्द हे अस्-कारांत असतात. उदा. हिरोडोटस, अपोलोनिअस, लोकस इ. त्यामुळे इंडुचे इंडस असे रूपांतर इंडोग्रीक राजांच्या काळात लगेचच झाले.
इंडिया / इंडिआ हे इंडस चे अनेकवचन आहे. मोठा, विस्तीर्ण, खूप अशा अर्थाने एखाद्या एकवचनी शब्दाचे बहुवचन करणे ही प्रत्येक भाषेची प्रवृत्ती असते. उदा. ज्या मोठ्या माणसांविषयी आपल्याला आदर वाटतो त्यांना आपण तू न म्हणता तुम्ही म्हणतो आणि सगळी अनेकवचनी क्रियापदं त्याबरोबर वापरतो; मोठा जलाशय या अर्थाने waters, विस्तीर्ण आकाश या अर्थाने skies असे शब्द वापरले जातात. त्याचप्रमाणे हा हिंदू प्रदेश खूप मोठा असल्यामुळे त्याचं अनेकवचन वापरात आलं. आणि ते अजून टिकून आहे.
चा ची चे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे आहेत. जेनेटिव्ह नावाची विभक्ती युरोपीय भाषांमध्ये षष्ठीचं कार्य करते. ग्रीक भाषेतील अस्-कारांत शब्दाचे जेनेटिव्ह रूप "का" या अक्षराने संपते. त्याप्रमाणे हिंदू प्रदेशाचं वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे इंडिका. थोडक्यात इंडिका या ग्रंथाच्या नावाचा अर्थ साधारणपणे "भारताविषयी थोडेसे..." असा होतो.
३) हर्षल खगोल यांनी भारत ची व्युत्पत्ती भा-रत म्हणजे तेजात रममाण झालेला अशी दिली आहे. संस्कृत भाषेच्या लवचिकतेचा छान आणि पटू शकण्यासारखा वापर त्यांनी केलेला आहे. या अर्थाबद्दल त्यांचं अभिनंदन. मात्र भारत हे नाव आपल्या देशाला या अर्थाने मिळालेलं नाही. भरताचा देश म्हणून भारत इतकं साधं ते आहे.
यानिमित्ताने "व्युत्पत्ती" या संकल्पनेविषयी थोडंसं सांगते. एखादा शब्द मुळात अस्तित्वात कसा आला, कोणत्या इतर शब्दघटकांपासून तो निर्माण झाला, तो वापरात आल्यापासून आजपर्यंतच्या काळात त्याच्या उच्चारात, अर्थात काय बदल झाले या आणि अशा अनेक अंगांनी शब्दाचा इतिहास शोधणारं, अभ्यासणारं शास्त्र म्हणजे व्युत्पत्तिशास्त्र होय. म्हणूनच भा-रत हा भारत चा एक अर्थ म्हणून शक्य आहे. हर्षल यांनी तसाच उल्लेख केला आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र ती भारत ची व्युत्पत्ती नाही. व्युत्पत्ती भरत पासूनच सांगता येईल.
४) रेड इंडिअन्स या नावाविषयी मुमुक्षू यांनी प्रश्न विचारला आहे की हे त्यांचे मूळ नाव होते की युरोपीयांनी त्यांना दिले. त्यासंदर्भात थोडेसे. रेड इंडिअन्स ना रेड इंडिअन्स असे नाव भारत अमेरिका व्यापारी संबंधांच्या सुरुवातीनंतर मिळाले. भारतातले ते ब्लॅक / ब्राउन इंडिअन्स आणि अमेरिकेतले रेड इंडिअन्स असा फरक केला गेला. ते नाव त्यांना अमेरिकेत स्थिरावलेल्या युरोपीयांनीच दिले.
तत्पूर्वी त्यांना केवळ इंडियन म्हटले जात असे. याचे कारण कोलंबस. पृथ्वी गोल असल्यामुळे युरोपातून पश्चिमेच्या दिशेने प्रवास सुरू केला तरी भारतास पोहचता येईल हे जणू सिद्ध करण्यासाठी कोलंबस तसा समुद्रप्रवासास लागला. आणि अमेरिकेची जमीन हीच त्याला इंडिआ वाटली ही गोष्ट आपल्याला माहित असेलच. त्यामुळे तेव्हापासून अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांना युरोपीय लोक इंडिअन्स म्हणून ओळखू लागली. पुढे तो भारत नाही हे कळले तरी ते नाव चिकटून राहिले.
या लोकांचा मूळ वंश शरूकी / चेरूकी cherooki अशा नावाचा आहे. बाकी अधिक माहित नाही. जालावर शोधा जरूर सापडेल.
या निमित्ताने एक आठवण सांगते. त्याचा या चर्चेशी खरंतर काही संबंध नाही पण अमेरिका भारत संबंधांवर नवाच प्रकाश टाकणारं एक ग्रेट संशोधन म्हणून याचा आस्वाद घ्या. मा. प्रशासक, माझं उत्तर चांगलंच लांबलं असलं तरी हे वगळू नका प्लीऽऽऽऽऽऽज!
अमेरिकेतले मूळ लोक कोणत्याही प्राचीन मानवाप्रमाणे निसर्गपूजक होते, त्यामुळे तिथेही सूर्यमंदिरे आहेत. निसर्गातील शक्तींच्या प्रतीकांची ख्रिश्चनांपेक्षा वेगळी पूजापद्धती आहे. ती भारतीय पूजापद्धतींप्रमाणे कर्मकांडप्रधान आहे. अशी काही साम्यस्थळं सापडणं हे खरंतर फार आश्चर्याचं नाही, कारण भूगोल वेगळा असला तरी मानवी प्रवृत्ती म्हणून काहीतरी एक समान धागा सर्व लोकांच्यात असतोच. परंतु भारत आणि अमेरिका यांच्या संस्कृतीतली अशी साम्यस्थळं शोधून आणि पृथ्वीवर भारत आणि अमेरिका यांचं पाठीला पाठ लावून उभं असल्यासारखं स्थान पाहून एका थोर संशोधक बाईंनी अमेरिका म्हणजे प्राचीन लोकांना माहित असलेले पाताळ होय असा शोध लावला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या बाई महाराष्ट्रातल्या, मराठी बाई आहेत!