धन्यवाद निखिल.
चित्त, माहितीची दखल घेऊन प्रश्न उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देतेय...
सिंडॉन या शब्दाच्या व्युत्पत्तिविषयी मला आत्ता काहीही माहित नाही. माहिती काढून खात्रीशीरपणे कळवेन.
हिंदू शब्द अमरकोशात असण्याचे कारण नाही. कारण तो संस्कृत शब्द नाही.
हा शब्द संस्कृत वाङ्मयात सर्वप्रथम बार्हस्पत्यशास्त्र नावाच्या स्मृतिग्रंथात आढळतो. या ग्रंथाचा काळ इ. स. १० - १४ वे शतक यादरम्यानचा असावा असे मानतात. पण मुळात पर्शिअन असलेल्या या शब्दाची प्राचीनता संस्कृत ग्रंथातील उल्लेखांवरून ठरवावी हे फारसे योग्य नव्हे. यावरून केवळ संस्कृत भाषेला त्याची दखल केव्हा घ्यावी लागली एवढेच माहित होऊ शकेल.
हिंदू या शब्दाचा पर्शिअन इतिहासातील पहिला ज्ञात उल्लेख नेमका शोधून मी कळवते.
भाषाभिमानी की हिंदुत्ववादी हा मुद्दा मला वाटतं वैयक्तिक मान्यतेचा आहे. मी यावर काही बोलणार नाही. आपले मत आपल्या ठिकाणी योग्य आहे.
भाषाशास्त्राच्या दृष्टीने हिंदुस्थान या शब्दात काय चूक आहे हे मला खरंच माहित नाही. जलस्थान, जन्मस्थान, मर्मस्थान वगैरे शब्दांसारखाच हा शब्द मला तरी दिसतो. आपण नेमकी चूक दाखवलीत किंवा, अशा अशा काही कारणांमुळे हा शब्द चूक आहे/ वाटतो असं काही नेमकं व्यक्त केलंत तर त्या दिशेने अभ्यास करायला काहीच हरकत नाही. मात्र तूर्तास या शब्दात काही चूक नसावी असं वाटतं.
यासंदर्भात दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की, भाषाशास्त्र भाषा घडवत नाही. भाषा ही आपोआप घडते आणि आणि त्याचा विचार भाषाशास्त्र करते. आपल्याला ज्ञात असलेल्या भाषेची संगती लावते. त्यामुळे "भाषाशास्त्रीय दृष्ट्या चूक" अशी काही संकल्पनाच मला वाटतं अवास्तव आहे. संस्कृतात एक सुभाषित छान आहे. त्याचे शब्द मला आठवत नाहीत, पण अर्थ असा- "(चंद्र या अर्थाचे शशांक, शशी, मृगांक असे शब्द आहेत त्यांचे उदाहरण दिले आहे.) शास्त्र काहीही सांगो, लोक जे बोलायचे तेच बोलतात. सशाचे चिह्न असलेल्या शशांक चंद्राला शशी (अर्थ तोच- सशाचे चिह्न असलेला) म्हणतात. पण मृगाचे चिह्न असलेल्या मृगांक चंद्राला मृगी म्हणत नाहीत."
खरेतर शास्त्राधाराने शब्दरचना केली तर मृगी शब्द चूक नाही, पण कोणी वापरत नाही. तसेच डित्थ, डवित्थ, गोणी (गाय) वगैरे शब्द कसे निर्माण झाले हे शास्त्र सांगू शकत नाही पण ते शब्द आहेत. हे संस्कृतचं उदाहरण त्या सुभाषिताच्या निमित्ताने दिलं पण हे तत्त्व म्हणून सर्व भाषांतील सर्व शब्दांच्या बाबतीत खरं आहे. त्यामुळे हिंदुस्थान या शब्दाबाबतची तुमची भूमिका मला पटलेली नाही. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे आपले म्हणणे नेमके काय हे लक्षात आले तर त्यावर अभ्यास करायला आवडेल.
हिंदुस्तान हा तर प्रदेशवाचक होताच पण नुसता हिंदू हा शब्द देखील मुळात प्रदेशवाचक होता. हिंदू प्रदेश हा शब्द निश्चितच इथे हिंदु/सिंधू नदीचा प्रदेश या अर्थाने वापरलेला आहे. संप्रदायाला हिंदू शब्द तेव्हा वापरात नव्हता.