ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे

ध्वजांगे = ध्वजाचा एक भाग

उचली = उचलतो

बाहो = बाहूंनी

आवेशे लोटला पुढे = आवेशाने पुढे नेतो.

महाभारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान होता. त्याने आपल्या बाहुबलाने अर्जुनाचा रथ मोठ्या आवेशाने पुढे पुढे नेला, अर्जुनाच्या विजयात मोठ वाटा उचलला असा संदर्भ आहे.

काळाग्नि काळरुद्राग्नी देखता कापती भयें

मारुतिला पाहून, काळ (मृत्यु)रूपी अग्नी, काळाचा (समय)रौद्र म्हणजे भयंकर अग्नी देखील भीतीने चळचळा कापू लागला. मृत्यू, समय कुणाला घाबरत नाही, ते अवध्य, अनिर्बंध आहेत अशी श्रद्धा आहे. पण मारुतीच्या बलापुढे त्यांनाही भीती वाटते.

ब्रह्मांड माइले नेणू आवळे दंतपंगती

माइले = मावले

नेणू = नयनांत, डोळ्यांत

मारुतिच्या डोळ्यांत सारे ब्रह्मांड मावले आहे. तो रागाने दात ओठ खात आहे.

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें

त्याच्या डोळ्यांतून रागाच्या ज्वाला जणू बाहेर पडत आहेत.

भृकुटी = भुवया. मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने तो पाहत आहे. (अशा भयंकर रूपामुळेच काळ त्याला घाबरला आहे.)

पुच्छ ते मुरडिले माथां किरिटीं कुंडले बरी

त्याने शेपूट फुलारले आहे, माथ्यावर मुकुट आणि कानात सुंदर कुंडले आहेत.

सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा

कमरेला सोन्याची कासोटी (अधोवस्त्र) बांधलेली आहे. त्यावर त्याचा कडदोरा आपटून मंजुळ घंटानादासारखा अवाज येतो आहे. (घंटा किंकिण नागरा या ओळीचा यापेक्षा चांगला अर्थ कोणाला माहित असेल, लावता येत असेल तर अवश्य सांगावा. मला स्वतःला हा अर्थ फार छान वटत नाही.)

ठका रे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू

असा हनुमान पर्वतासारखा उभा ठाकलेला आहे. तो शरीराने बांधेसूद, सडपातळ आहे.

चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी

चपळांग = शेपूट. त्याची शेपूट मोठी आहे आणि विजेसारखी चपळ आहे. (हिच्याच जोरावर त्याने लंका दहन केले.)