कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे

कोटिच्या कोटी = मोठे, प्रचंड

मोठे उड्डाण घेऊन हनुमान उत्तर दिशेला झेपावला.

मंदाद्रिसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें

त्याने मंदार पर्वतासारखा प्रचंड द्रोण पर्वत क्रोधाने मुळासकट उपटून काढला.

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती

तो पर्वत त्याने (लंकेच्या युद्धभूमीवर) आणला आणि परतही नेला. हा प्रवास त्याने मनाच्या प्रचंड वेगाने केला.

मनासी टाकिले मागे गतिसी तुळणा नसे

खरे तर वेगाच्या बाबतीत त्याने मनालाही मागे टाकले.

संजीवनी मुळी ज्यावर सापडते तो द्रोणागिरी लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानाने लंकेला उचलून आणला या घटनेचा हा सगळा संदर्भ आहे. मनाचा प्रवासाचा वेग सर्वात जास्त मानला जातो. त्या मनालाही मागे टाकणाऱ्या वेगाने हनुमानाने हे काम केले आणि त्यामुळेच लक्ष्मणाचे प्राण वाचले. अक्खा पर्वत उचलून आणणे आणि अशा प्रचंड वेगाने प्रवास करणे यासाठी आवश्यक असलेले बळ हनुमानाजवळ होते त्या बळाची ही स्तुती आहे.

अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे

हनुमानाला अष्टसिद्धी प्राप्त होत्या. त्यातल्या दोन सिद्धींचा हा उल्लेख आहे.

अणिमा = अणुएवढा लहान देह करता येणे, महिमा = आपल्या इच्छेनुसार मोठ्यात मोठा आकार धारण करता येणे. येथे  हनुमान अगदी अणुपासून ते संपूर्ण ब्रह्मांडाएवढा मोठा हूउ शकत असे असे वर्णन आहे. त्याने अणुरूप धारण करून अशोकवाटिकेत सीतेजवळ जाण्यात यश मिळवले आणि महाकाय रूप धारण करून समुद्रातील राक्षसीचा वध केला ह्यासारख्या कथांमध्ये त्याने या सिद्धीचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात.

ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छें करू शके

आपल्या वज्रासारख्या सामर्थ्यवान शेपटाने तो अक्ख्या ब्रह्मांडाभोवती वेढे घालू शकतो एवढे प्रचंड रूप तो धारण करू शकतो.

तयासी तुळणा कोठे मेरुमांदार धाकुटे

हनुमानाशी कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही. मेरु, मांदार (मंदार) यासारखे प्रचंड पर्वतही त्याच्यापुढे धाकटे = लहान वाटतात.

तयासी तुळणा कैसी ब्रह्माण्डी पाहता नसे

अशा या हनुमानाला साऱ्या विश्वात तुलनाच नाही.

आरक्त देखिले डोळां ग्रासिले सूर्यमंडळा

त्याने जन्मल्या जन्मल्या लालभडक सूर्यबिंब पाहिले आणि त्याला फळ समजून ते गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले.

वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा

शून्यमंडळ = संपूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स. आपला आकार संपूर्ण विश्वाला भेदून जाईल असा मोठा करणे त्याला शक्य होते.

धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तही

पावती रूपविद्यादि, स्तोत्रपाठे करोनिया

हे स्तोत्र पठन करणाऱ्याला धन धान्य पशुधन यांत वृद्धी= समृद्धी प्राप्त होते. पुत्रपौत्र रूप विद्या यांचा लाभ होतो.

भूतप्रेतसमंधादि रोग व्याधि, समस्तही

नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें

भीम = येथे मारुती. मारुतीचे दर्शन घेतले असता त्या आनंदाने भूत, प्रेत, समंध, सर्व रोग, आजार, वेदना नाहीशा होतात. चिंता नाहीशा होतात. 

मारुतीची उपासना करून बल मिळवले म्हणजे शरीर निरोगी होते, आपल्या शक्तीच्या जाणीवेने भूत, प्रेत, समंध यांची भीती नाहीशी होते. निरोगी शरीरात मनही चिंतामुक्त, निरोगी राहण्यास मदत होते. (A sound mind in a sound body) असा भावार्थ आहे.

हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली बरी

हे पंधरा श्लोकी स्तोत्र म्हणणाऱ्यास लाभो, शोभो. म्हणजे याच्या पठनाने बल लाभूदे.

दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें

जो हे स्तोत्र म्हणेल त्याला निश्चितपणे शुक्लपक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होत जाणारा, बलिष्ठ देह प्राप्त होईल.

रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणु,

रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती

रामाच्या सेवकांपैकी सर्वांत श्रेष्ठ, कपि=वानर कुलाला भूषणावह, ज्याचा अंतरात्मा प्रत्यक्ष रामाच्याच ठिकाणी आहे अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व, दोष, पापे यांचा नाश होतो.

प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. त्यात हे स्तोत्र ऐकणे, म्हणणे, त्याचे नेमाने पठन करणे याने काय लाभ होतात याचे वर्णन असते. त्या त्या काळातील महत्त्वाचे असे जे भौतिक, धार्मिक, आध्यात्मिक लाभ असतील ते सगळे या स्तोत्राने होतील अशी योजना स्तोत्राच्या शेवटी केलेली दिसते. धनधान्य... दोष नासती या श्लोकांमध्य अशी फलश्रुती दिलेली आहे. समजून घेताना ती अक्षरशः खरी मानायची नसते. याचा अर्थ "या स्तोत्रामुळे सर्व प्रकारची समृद्धी मिळेल असा समजून घ्यावा लागतो."

इति श्रीरामदासविरचितं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्

अशा प्रकारे रामदासांनी रचलेले मारुतिस्तोत्र पूर्ण झाले.