श्री चित्त साहेब,

आपली गझल आली हे पाहून खूप आनंद वाटला. गझल दर्जेदार आहेच! शेवटचे दोन शेर लाईव्ह ऐकायला मिळाले असते तर फारच मजा आली असती :)

माझी काही मते मांडत आहे. वरील प्रतिसादांपेक्षा फारच वेगळी वाटतील. कृपया माफ करावेत.

हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता

शेरातील पहिल्या ओळीतील मुद्दाच दुसऱ्या ओळीत सांगीतलेला आहे असे माझे मत आहे. किंवा, हा प्रवास ठरला नव्हता अन मी ठरवला नव्हता असे! शेराच्या दोन ओळींच्या उपलब्धतेचा पूर्ण फायदा घेतला गेलेला नाही असे वाटते.

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

या शेरामधील 'पण' हा इंग्रजी 'बट' या अर्थी आहे की इंग्रजी 'अल्सो' या अर्थी आहे हे कृपया सांगावेत. मला असे वाटते की जर तो 'बट' या अर्थी असेल तर तो मध्येच आल्यासारखा वाटतो अन जर 'अल्सो' या अर्थी असेल तर 'पण' ऐवजी 'ही' बरा बसेल असे वाटते. शेराच्या दोन ओळींमधील परस्पर संबंध दृढ होण्यासाठी 'पण' किंवा 'पण'दर्शक शब्द शेराच्या सुरुवातीला येणे आवश्यक वाटते. 'मी कधीही तुझ्या निष्ठांची किंमत केली नाही पण तुझाही भाव कधी एवढा घसरला नव्हता' असे विधान होण्यासाठी!

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

मस्त! 'होता'च्या ऐवजी 'नव्हता' कसे योग्य व जास्त मसालेदार आहे यावरचे आपले मत अतिशय पटले. इतका बारीकसारीक विचार करून शेर रचणे हे खरे तर वैभवच मानायला पाहिजे.

केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता - उत्तम शेर! वादच नाही.

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

जबरदस्त शेर! किंवा या एकाच शब्दाने किमया केली आहे.

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता - उत्तम शेर!

एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता - पुलस्तीसाहेबांच्या शेराची आठवण झाली.

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही

सुचणे, लिहिणे हे कवीला वेदनादायक असू शकते या पातळीला पोचायला मला बराच अवधी असावा.

मात्र, आपली ही गझल आपल्या इतर गझलांच्या तुलनेत मागे आहे हे माझे स्पष्ट मत आहे.

राग नसावा.

एक 'निष्ठावान' चाहता! - भूषण कटककर