ब्राह्मण-सीकेपी-सारस्वत-शाण्णव कुळी वा उच्चवर्णीय म्हणायचे नसेल, किंवा कुत्सित अर्थाने 'तथाकथित' म्हंणायचे नसेल तर काय म्हणायचे? एक मार्ग आहे पांढरपेशा. या जातींतले राजकारणी सोडले तर उरलेले सर्व पांढरपेशा असतात. या पांढरपेशा वर्गातले पुरुष पांढरेशुभ्र कपडे घालतात.  याचा अनुभव मी दरवर्षी ब्रेबॉर्न स्टेडियमवर नानी पालखीवालांच्या भाषणाच्या वेळी घेत असे. तुडुंब भरलेल्या मैदानातील श्रोतृवृंदाकडे नजर टाकली की शिडीच्या खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत आणि मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत शुभ्रवसनधारी समाज जिवाचे कान करून भाषण ऐकत असल्याचे दिसायचे. कार्यक्रम संपला की पांढऱ्याशुभ्र कपड्यातील पुरुषांची आणि फिक्या रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रियांची शिस्तबद्ध पलटण मैदानाबाहेर पडायची.  गेले ते दिवस! अंदाजपत्रकासारख्या किचकट विषयावर कागदाच्या एखाद्या चिठोऱ्याशिवाय कुठलेही साहित्य जवळ न ठेवता अस्खलित बोलणारा वक्ता पुन्हा होणे अशक्य.