भूषण,
१. प्रयत्न फसला असे तुम्ही म्हणालात असे मला म्हणायचे नव्हते. अशा स्वरूपाची समीक्षा नसावी असे सामान्य विधान केलेले होते.
२. चित्त हे स्वतः उत्तम गझलकार आहेत, त्या बाबत ज्येष्ठ आणि अनुभवी, यशस्वी आहेत हे निःसंशय. पण म्हणून तुम्हाला इतरांच्या गझलांवर परखड / प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही असे, विनयाने / रागाने / उपहासानेही म्हणू नका. आधीच म्हटल्याप्रमाणे एखादी रचना जितकी कवीची तितकीच वाचक-रसिकाचीही असते आणि ती आवडण्याचा / नावडण्याचा आणि ते व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार त्यालाही असतो. तुम्हाला तो अधिकार आहेच.
मात्र "मला आवडलं नाही" आणि "तुमचं चुकलं" या दोन्ही सुरांत फरक आहे. मला तुमच्या पूर्वीच्या प्रतिक्रियेत "तुमचं चुकलं" असा सूर लागल्यासारखं वाटलं. तो सूर कवीच्या स्वातंत्र्याला अमान्य करणारा आहे. म्हणून तो सूर समीक्षेत नसावा असं मत मी मांडलं.
तुम्हाला चित्त यांची ही रचना आवडलीच पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण तुम्हाला ती आवडली नाही याची जी कारणं तुम्ही दिली आहेत, त्यांचा विचार करू.
शेराच्या दोन ओळींच्या उपलब्धतेचा पूर्ण फायदा घेतला गेलेला नाही असे वाटते.
येथे दोन ओळींचा फायदा घेणे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे होते? त्या दोन ओळींतून एकच आशय व्यक्त होणे हे तो आशय अधिक गडद होण्याच्या दृष्टीने कवीला अभिप्रेत असू शकते. तशी रचना करण्यामागे काही स्पष्ट किंवा अस्फुट असा कवीचा हेतू असू शकतो. दोन ओळींतून आशयाचे दोन पदर व्यक्त झाले पाहिजे होते ही तुमची अपेक्षा झाली, ती पूर्ण झाली नाही हे मान्य. पण याबाबत कवीचे मत / हेतू वेगळे असू शकतात. ही गोष्ट जमेस धरली तर या दोन ओळींतून एकच आशय व्यक्त करण्यामागे कविची दृष्टी काय होती? काही विषेश विचार होता का नव्हता? असा प्रश्न पडणे आणि कवीने फायदा घेतला नाही असे विधान करणे यांत फरक आहे. तुम्ही केलेले विधान हे कवीने तुमची अपेक्षा पूर्ण करायला हवी होती असा आशय व्यक्त करणारे आग्रही (कदाचित दुराग्रहीसुद्धा) वाटत होते. अशा स्वरूपाची समीक्षा नसावी असे माझे प्रामाणिक मत आहे. (पुन्हा आपणही विचारपूर्वकच लिहिले असल्याने माझे हे मत आपल्याला अप्रस्तुत वाटू शकेल, त्याबद्दल क्षमा करा. )
या शेरामधील 'पण' हा इंग्रजी 'बट' या अर्थी आहे की इंग्रजी 'अल्सो' या अर्थी आहे हे कृपया सांगावेत. मला असे वाटते की जर तो 'बट' या अर्थी असेल तर तो मध्येच आल्यासारखा वाटतो अन जर 'अल्सो' या अर्थी असेल तर 'पण' ऐवजी 'ही' बरा बसेल असे वाटते.
शेराच्या दोन ओळींमधील परस्पर संबंध दृढ होण्यासाठी 'पण' किंवा 'पण'दर्शक शब्द शेराच्या सुरुवातीला येणे आवश्यक वाटते. 'मी कधीही तुझ्या निष्ठांची किंमत केली नाही पण तुझाही भाव कधी एवढा घसरला नव्हता' असे विधान होण्यासाठी!
या ठिकाणी काय असते तर बरे झाले असते वगैरे सूचना तुम्ही केल्या आहेत. "ते असं असतं तर बरं" हे एका वाचकाचं मत आहे, कवीने त्याबाबत जागरूकपणे किंवा लेखनाच्या ओघात अभावितपणे विचार केलेला असतो ही गोष्ट जमेस धरली तर अशा प्रकारच्या सूचना अप्रस्तुत ठरतात असा माझ्या म्हणण्याचा आशय होता.
असो. या निमित्ताने अशी चर्चा होत आहे हेच खूप छान आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः नाही का?