सन्माननीय ऋचाजी,

धन्यवाद! मस्त प्रतिसाद दिलात. कदाचित माझा तसा सूर वाटला असल्यास माफ करा. चित्तसाहेबांच्या रचनेवर असे भाष्य ( अगदी रसिकाचीही कविता असू शकते हे मान्य केले तरी ) करण्याचा अधिकार माझा नाही. याचे कारण मला 'गझल' कशी रचली जाते हेच मुळी त्यांच्या साईटवर सदस्य झाल्यावर समजले.

पण, आपण 'वादे वादे'चा उल्लेख केला आहेत म्हणून घोडे थोडे पुढे दामटतो. चित्तसाहेब माझी मते 'लिंबू टिंबू' समजून दुर्लक्ष करतील अशी खात्री आहे.

मी तशी मते मांडण्याची कारणेः

१. एका गझलकाराच्या एका शेराबाबतीत स्वतः चित्त यांनी असे म्हंटले होते की  शेरातील पहिल्याच ओळीत सगळे सांगून झाले आहे असे वाटत आहे. याचा अर्थ असा की गझलेतील द्विपदींमध्ये प्रत्येक ओळीत आशय बऱ्यापैकी समसमान विभागला जावा असे म्हणायचे असावे.

उदाहरणासाठी एक वेगळाच शेर घेत आहे.

सौंदर्यावर मला भाळणे जमले नाही
प्रेमामध्ये जीव टाकणे जमले नाही

यात आशयाची समसमान वाटणी झालेली दिसत नाही. एकच मुद्दा दोन्ही ओळीत सांगीतला आहे असे वाटते. म्हणजे कवीने एकच ओळ रचली असती तरी रसिकाच्या मनात तीच भावना आली असती. याऐवजी शेर जर असा असताः

सौंदर्यावर मला भाळणे जमले नाही
तिच्यासारखे जीव टाकणे जमले नाही ( ही अस्मादिकांची पार्टटाईम प्रतिभा )

तर याच्यामध्ये अर्थाचा आणखीन एक फील येतो. त्यात ही जी कोण 'ती' होती तिने कवीवर जीव टाकला होता पण कवीला मात्र तसे करता आले नाही असाही एक अर्थ येतो. आता ते तसे का करता आले नाही वगैरे वेगळा भाग आहे. पण दोन ओळींमध्ये काहीतरी वेगळे आले.

यावर आपला मुद्दा असा होता की तसे मुळात कवीला म्हणायचेच नसले तर? बरोबर आहे. नसलेच म्हणायचे तर कुणीच काही म्हणू शकत नाही. पण कविता जेव्हा जाहीर केली जाते तेव्हा प्रतिसाद, चर्चा, वादविवाद हे होणारच! त्यातून काहीतरी नवीन विचार येऊ शकतो. तेव्हा मला वाटते ही चर्चा तशी हेल्दी आहे, निदान माझ्यासाठी तरी!

२. या ठिकाणी काय असते तर बरे झाले असते वगैरे सूचना तुम्ही केल्या आहेत. "ते असं असतं तर बरं" हे एका वाचकाचं मत आहे, कवीने त्याबाबत जागरूकपणे किंवा लेखनाच्या ओघात अभावितपणे विचार केलेला असतो ही गोष्ट जमेस धरली तर अशा प्रकारच्या सूचना अप्रस्तुत ठरतात असा माझ्या म्हणण्याचा आशय होता.

आता पहा:

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

अर्थ - मी तुझ्या निष्ठांची किंमत कधीच केली नाही (पण ) तुझा (ही ) भाव एवढा घसरला नव्हता.

आता जर कंसातल्या पण सारखा त्या पण चा अर्थ नसेल तर शेराचा अर्थ असा होईलः

मी तुझ्या निष्ठांची किंमत कधीच केली नाही ( तरीही /किंवा/कारण ) तुझाही भाव एवढा घसरला नव्हता.

१. म्हणजे किंमत केली नाही तरीही भाव इतका घसरला नव्हता ( म्हणजे किंमत केल्यावर भाव घसरायचा )

किंवा

२. मी किंमत केली नाही किंवा तुझाही भाव घसरला नव्हता - म्हणजे यातील काहीतरी एक झाले होते. म्हणजे मीही किंमत केली नाही अन तुझाही भाव घसरला नव्हता.

किंवा

३. मी किंमत केली नाही कारण तुझाही भाव घसरला नव्हता - म्हणजे भाव घसरल्यावर किंमत करायची होती.

याचा अर्थ त्या 'पण' चा अर्थ 'कंसातल्या पण'सारखा असणे आवश्यक झाले.

आता त्या पणचा अर्थ जर कंसातल्या 'ही'सारखा नसेल तर अर्थ असा होईल.

मी तुझ्या निष्ठांची किंमत केली नाही पण तुझा भाव एवढा घसरला नव्हता.

या विधानामध्ये 'तुझा' या शब्दात अपेक्षित असलेला फोर्स कमी होत आहे कारण 'तुझाही' च्या ऐवजी 'तुझा' असे होत आहे. किंवा ही दोन विधाने एकमेकांमध्ये परस्पर संबंध असलेली आहेत की नाही असा संदेह निर्माण होऊ शकेल.

याचा अर्थ मी असा घेतो की 'पण' किंवा 'ही' या दोन्ही अर्थाने एक एक शब्द असायला हवा. चित्त साहेबांनी म्हंटलेलेच आहे की त्यांनी वापरलेला 'पण' हा त्या दोन्ही अर्थांनी आहे.

माझा मुद्दा इतकाच होता की त्या अर्थाचे दोन शब्द मला अपेक्षित होते. पण आपणच म्हंटल्याप्रमाणे हा गझलकाराचा निर्णय आहे.

गैरसमज नसावेत. चुकून काही जास्त बोलले गेले असल्यास माफ करावेत.

धन्यवाद!

एक निस्सीम गझल चाहता - भूषण कटककर

आमची सही - आक्रोश का असेना पद्यामधे बसावा - जगणे मला कधीही जमलेच गद्य नाही