स्थान दर्शवण्यासाठी सप्तमीच्या 'त' ला ताणायचा, हे पटत नाही. स्थान दर्शवायचे असेल तर त्याकरता आपण वर नमूद केल्याप्रमाणे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत (उदा. अंगावर शर्ट चढवला, गळ्याभोवती मफलर गुंडाळला) जे व्याकरण आणि अर्थ या दोन्ही दृष्टींनी योग्य आहेत. त्याचप्रमाणे स्थानदर्शक म्हणून या 'त' चा वापर काही विविक्षित ठिकाणीच होतो, सर्वत्र नव्हे. उदा. आपण 'घोड्यावर जीन चढवले/कसले' असेच म्हणतो; 'अंगावर गोधडी/शाल पांघरली' असेच म्हणतो, किंवा 'कपाळावर गंध लावले' असेच म्हणतो. या ठिकाणी आपण 'घोड्यात जीन घातले'; 'अंगात गोधडी/ शाल घातली'; 'कपाळात गंध घातले' असे म्हणत नाही.
सारांश काय, की व्याकरण आणि अर्थ या दोन्ही दृष्टींनी योग्य असणारे प्रयोग उपलब्ध असताना, (आणि, मी वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे सर्वसामान्य मराठीत योजलेही जात असताना), रुढ असलेले परंतू अर्थाच्या दृष्टीने अयोग्य प्रयोग वापरुन त्यांचे समर्थन करण्यापेक्षा मुळातच योग्य प्रयोग वापरणे मला ईष्ट वाटते.