मुख्याध्यापकांना भ्रमणध्वनी वापरू न देणे यात काहीच अर्थ नाही. बहुतांश ठिकाणी (शहरांतून तर नक्कीच) मुख्याध्यापकांना शाळेची प्रशासकीय / व्यस्थापकीय कामेच इतकी असतात की ते तास घेत नाहीत. शिवाय या कामांकरिता त्यांना अनेक ठिकाणी ये जा ही करावी लागत असते. त्यांच्यावर बंधन घालण्याचे कारणच नाही.

शिक्षकांनाही तासाच्या वेळी भ्रमणध्वनी न वापरण्याची सूचना द्यावी / सक्ती करावी. इतर वेळात त्यांनाही भ्रमणध्वनी वापरू द्यायला काय हरकत आहे?

विद्यार्थ्यांना शाळेत भ्रमणध्वनी वापरण्यास बंदी अवश्य असावी. पण येथेही आधुनिक पालकांची "गरज" आड येते. म्हणजे, बरेचदा मुले शाळेनंतर कसल्या कसल्या "क्लासां"ना जातात. काही मुले पाळणाघरात तर काही छंदवर्गांना जातात. पालक दोघे आपापल्या कार्यालयांत असतात. मुले आपापल्या व्यवधानांत असतात. मग दिवसभरात पालकांचे मुलांशी सहज संभाषण व्हावे म्हणून बऱ्याच मुलांना भ्रमणध्वनी घेऊन दिला जातो. पण शाळेत असताना तो बंद ठेवण्याची सक्ती अवश्य केली जावी. पालकांना तातडीच्या विशेष कामासाठी / निरोपासाठी मुलांशी संपर्क साधण्याची गरज पडल्यास शाळेच्या दूरध्वनीवर / वर्गशिक्षकांच्या भ्रमणध्वनीवर तो साधता येईल अशी व्यवस्था ठेवावी.