स्वतःला जपण्याची बुद्धी प्रत्येकाला उपजत असते आणि त्यामुळे टेक केअर म्हणून स्मरण करून देण्याची गरज नसली तरी, "आपली माणसं" जी असतात त्यांची काळजी वाटत असतेच. आणि ही भावनाही त्याच देवाने प्रत्येक बुद्धिमान जीवाला दिलेली आहे.

त्यामुळे जपून जा, सांभाळून राहा, किंवा त्याचाच इंग्रजी अवतार टेक केअर असं अगदी मनापासून आपुलकीनं आणि पूर्ण अकृत्रिमपणे म्हटलं जातं. आता अनेकदा म्हणून ते सवयीनंही वापरलं जातं. पण मुख्यतः त्यामागे आपुलकीचं माणुसकीचं नातं असतं.

शिवाय नकळत कुठेतरी असंही वाटत असतं की आताच्या जगात तुम्ही सावध असाल तरीही तुम्हाला कोणत्याही क्षणी काहीही; अगदी जिवाचाही धोका असू शकतो. तेव्हा अशा स्वरूपाची काळजी घ्या, सुखरूप राहा अशी ही सदिच्छाही असते.

अगदी आपल्या लहानपणीचे प्रवासालाच काय पण रोजचे शाळेत / हापिसात निघाल्यावर सुद्धा जपून जा म्हणणारे आजी आजोबा - आई बाबा - बायको वगैरे होतेच ना? ती भावना कृत्रिम असते का? नाही ना? मग मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना म्हटले तर त्यात वावगे काय? याबाबत शुमंशी पूर्ण सहमत. 

केवळ भाषा बदलली म्हणून त्यामागची भावना कृत्रिम ठरू शकत नाही.

टेक केअरच्याऐवजी जपून जा, सांभाळून राहा, काळजी घ्या का म्हणू नये? याबाबत मात्र भूषणशी पूर्ण सहमत आहे. आपली भाषा अवश्य वापरावी आणि वापरण्याचा आग्रहही धरावा, पण कोणत्याही भाषेत असे काही म्हणणेच कृत्रिम आहे असे मात्र मुळीच नाही.