पूर्वी रोग कमी होते अशातला भाग नसावा पण त्यांची तीव्रता आतासारखी निश्चित नसणार. आता म्हणजे टेस्टस, हॉस्पिटल्स आणि तिथल्या वातावरणालाच रोगी जास्त घाबरतात असे वाटते.
आमच्या फॅमिली डॉक्टरांचं वय बरंच होतं पण त्यांच्या हाताला खरंच गुण होता. त्यांच्याकडे आजच्या परिभाषेत अद्ययावत ज्ञान नसेल कदाचित पण त्यांच्या क्षेत्रात ते खूपच यशस्वी होते हे निश्चित. त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी अर्धा आजार पळून जात असे. त्यांचं औषध लागू पडलं नाही असं क्वचितच होई आणि तसं झालं तर त्यांनाच खूप काळजी वाटायची.
हल्लीच्या काही डॉक्टरांची रोग्याच्या बाबतीतली वागणूक अक्षरशः "कुत्ता जाने चमडा जाने " अशी असते ती पाहून धक्काच बसला.
पूर्वी नुसत्या नाडीपरीक्षेवरून आजार, त्याचं स्वरूप, त्याची तीव्रता, त्याचं नवेजुनेपण इ. गोष्टी अचूक ओळखणारे वैद्य / डॉक्टर्स होते असं म्हणतात. आजकाल , दुर्दैवाने माणूस आणि निसर्गप्रकृती यांच्यापेक्षा संख्याशास्त्रालाच अधिक महत्त्व देऊन, समोरच्या माणसाला संख्याशात्राच्या कोष्टकात मारूनमुटकून का होईना पण बसवणारेच डॉक्टर अधिक भेटतात हे दुर्दैवाने खरं आहे. ( हे म्हणजे मुलाला विजार आखूड होते म्हणून त्याचे पाय कापून त्याचीच उंची कमी करण्यातला प्रकार आहे असं काहीसं विनोदाने आणि बरचसं खेदाने म्हणावंसं वाटतं ). शिवाय ही कोष्टके नक्की कशी ठरवतात याबद्दलही मतभेद असू शकतात. 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या डॉ. अभय बंग यांच्या पुस्तकात, हृदयरोगाबद्दलचे बरेचसे आकडे अमेरिकी समाजात घेतलेल्या निरीक्षणांवर आधारित असल्याने, ते प्रमाण मानून भारतीय रुग्णांवर उपचार करणं कसं धोकादायक ठरू शकतं याबद्दल वाचल्याचं आठवतंय. (चूभूदेघे)
शिवाय सेकंड - थर्ड - फोर्थ -एन्थ ओपिनियन ची मारुतीची शेपटी तर भयावहच असते. त्याबाबतीत बोलणेच नको. माझ्या माहितीत , एका माणसाचे रिपोर्टस एका दिवशी थोडे ऍबनॉर्मल आणि दोन दिवसांनंतर नॉर्मल आलेले पाहून, डॉक्टरांनी लॅबवरच शंका घेतल्याचंही उदाहरण घडलेलं आहे. हे ऐकल्यावर, डॉक्टरांवरचा आणि लॅबवरचाही विश्वास कसा शाबूत राहणार? अशा वेळी बिचाऱ्या रुग्णाने कोणाच्या तोंडाकडे बघावं याचं उत्तर मात्र अजूनही कळू शकलेलं नाही.
--अदिती