श्री. भूषण कटककर साहेब ,

माझ्यामते समाज हा व्यक्तीसाठी असून व्यक्ती समाजासाठी नसते. समाजात राहण्यासाठी अगदी प्राथमिक अशा व्यक्तिस्वातंत्र्याचाही संकोच होणार असेल तर असा समाज काय कामाचा? शिवाय एखाद्या व्यक्तिने कोणते कपडे घातले आहेत त्याने समाजाला काय त्रास होतो? केवळ इतर लोक अपरिपक्व आणि उथळ आहेत म्हणून मी मला आवडणारे कपडे घालू नयेत? शिवाय आकर्षक दिसणे व इतरानी आपल्याकडे पाहणे हे काही प्रमाणात युवतीनाही आवडतेच हे मान्य व्हायला हरकत नसावी.

खरा आक्षेप तर मुलींच्या कपड्यांवरून त्यांच्या चारित्र्याबद्दल निष्कर्ष काढणाऱ्या वृत्तीला घेतला पाहिजे. लैंगिकदृष्ट्या अज्ञानी व विकृत लोक असे कपडे पाहून चेकाळतात आणि अचकट-विचकट बोलतात किंवा प्रसंगी विनयभंग वगैरेही करू धजावतात. अशा वृत्तीलाही बऱ्याच अंशी समाजातील झाक-पाक कारणीभूत आहे. जो पर्यंत समाजात या विषयाबाबत खुलेपणा येत नाही आणि लोकांचे विचार बदलत नाहीत तो पर्यंत हे बदलणार नाही. मग मुलीनी कितीही अंगभर कपडे घातले तरी उपयोग नाही कारण जेवढं झाकाल तेवढी अतिउत्सुक आणि विकृत लोकांची संख्या वाढत जाणार.

ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत आणि आपण यास सहमत असालच असे नाही. तरीही आपल्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि आपण माझे मत ऐकून घेतले या बद्दल धन्यवाद!