मुंबईत अशा झोपडपट्ट्या आहेत आणि तिथे अशी भीषण गरिबी आहे आणि अनेक अनैतिक धंदे चालतात हे वास्तव कोणीच नाकारत नाही आणि नाकारूही शकणार नाही. त्या चित्रपटाने दाखवले ते वास्तव आहे की नाही हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ऑस्कर पुरस्कार हे चित्रपटाच्या दर्जाशी संबंधित आहेत आणि चित्रपट वास्तव दाखवणारा असो वा पूर्णतः फॅंटास्टिक, त्याचा दर्जा उत्तम असेल तरच त्याला ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा या बाबत दुमत नसावे. या आधी ऑस्कर मिळालेले चित्रपट पाहून जसा परिणाम होतो मनावर तसा या चित्रपटाने होतो का? जमालच्या कथेत आपण गुंतून जातो का? जो पाहून आपण अंतर्बाह्य थरारून जाऊ असा एक तरी प्रसंग चित्रपटात आहे का? तिकडे पश्चिमेत या चित्रपटाला feel good चित्रपट म्हणतात म्हणे. मला तर चित्रपट पाहून काहीच नाही वाटले. तो मोठा झालेला जमाल इतका उर्मट, सुखवस्तु आणि इंग्रजाळलेला वाटतो की त्याला पैसे मिळतात हे पाहून काहीच वाटत नाही. गेम शो चा संचालकसुद्धा विनाकारणच त्याला भर कार्यक्रमात 'चायवाला' म्हणून का हिणवेल? कथेच्या एकूण परिणामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून एकामागे एक क्रूरता, दुष्टता आणि बीभत्सता असलेले प्रसंग जोडून दिले आहेत असंच वाटत राहतं. ना जमाल-लतिकेचं प्रेम फुललेलं नीट दाखवलय ना जमालला आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल चीड ना खंत. नुसतंच आपलं काही तरी घडत राहतं. त्यामुळे केवळ भारतातील गरिबी पाहून ऑस्करच्या ज्युरीना सॅडिस्टिक आनंद मिळाल्याने त्याला पुरस्कार मिळाला असे म्हणण्यास वाव आहे असे मी मानतो.
या चित्रपटाला पुरस्कार मिळाला म्हणून भारतीयानी स्वतःचीच जय हो वगैरे करण्याएवढा हास्यास्पद प्रकार दुसरा नाही. भारतीय नटांची कामगिरी तर अतिशय सुमार आणि कंठाळी तर आहेच शिवाय गुलजार आणि रहमान यांचं हे सर्वोत्तम काम नाही वाटत. विशेषतः लगानचे संगीत या पेक्षा उजवे असूनही तेव्हा रहमानला पुरस्कार जाऊ द्या पण नामांकनही मिळाले नाही. ऑस्करच्या समारंभात अनिल कपूर वगैरे मंडळींची व्यासपीठावर जाण्याची धडपड पाहून कीव मात्र फार आली.