मला तरी वाटत आहे की फक्त लालकृष्ण आडवाणी आता भारताला सावरू शकतात.
हे विधान तुम्ही कशाचा जोरावर करीत आहात ?
मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून मी भाजप-सेनेला मतदान करीत होतो. परंतु निदान भाजपच्या बाबतीत तरी पूर्ण भ्रमनिरास झालेला आहे. प्रथम आडवाणींविषयीः
१)भारताच्या संसदेवर व अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला तेव्हा हेच गृहमंत्री व उप-पंतप्रधान होते ना? काय केले त्यांनी? संसदेवरील हल्ल्यानंतर लाखो सैनिक सीमेवर नेऊन सहा महिने बसवले. २० अतिरेक्यांची/गुन्हेगारांची यादी पाकिस्तानास दिली व त्या सर्वांस भारताच्या हवाली केल्याशिवाय कुठलीही बोलणी होणार नाहीत इत्यादी राणा भीमदेवी गर्जना केल्या व पाकिस्तान्यांची करमणूक केली. सीमेपलीकडून सीमेवर हात चोळत बसून असलेल्या आपल्या सैन्यास पाहून अतिरेकी व पाक सैनिक खो खो हसले असतील. हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून निष्पन्न काय? शून्य! (नाही म्हणायला एक फायदा झाला - आपल्या सीमेलगतच्या शेतांना लाखो सैनिकांच्या शरीरधर्मामुळे पुष्कळ नैसर्गिक खत मिळून ती शेते सुपीक नक्की झाली असतील. )
हे कमी म्हणून की काय, पदच्युत झाल्यानंतर पाकिस्तान भेटीवर गेलेल्या आडवाणींना जिन्नाह निधर्मी असल्याचा जावईशोध लागला हे माझ्याप्रमाणेच कोट्यवधी भारतीय विसरलेले नाहीत.
आता भाजपविषयी :
२)भाजपचे हिंदूप्रेम केवळ निवडणुका जवळ आल्या की उफाळून येते. सत्ता हाती आल्यावर या पक्षाला हिंदूहित, राम-मंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७० ह्या साऱ्यांचा सोयीस्कर विसर पडतो.
३)एक महाराष्ट्रीय म्हणून विचार केला तर हे कसे विसरावे की भाजपने आजवर महाराष्ट्र एकसंध ठेवण्याबद्दल ठाम भूमिका घेतलेली नाही. बेळगावचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यास पाठिंबा देणे सोडाच, स्वतंत्र विदर्भाच्या कल्पनेसही हा पक्ष तिलांजली द्यायला तयार नाही.
४)मराठी माणूस म्हणून जेव्हा ह्या पक्षाकडे पाहतो तेव्हा काय दिसते? काही महिन्यांपूर्वी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मधू चव्हाण ह्यांची नेमणूक झाली होती. याविरुद्ध वैयक्तिक कारणांवरून मुंढेंनी बंडाळी करताच चव्हाण ह्या मराठी माणसाचा बळीचा बकरा करून गोपाळ शेट्टी ह्या अमराठी व्यक्तीस त्या जागेवर बसवले.
ह्या साऱ्या घटनांकडे पाहिल्यावर आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून आडवाणींना खंबीर, विश्वासार्ह नेता मानावे व भाजपला मते द्यावी?
भारतीय म्हणून - वरील (१) पाहा
हिंदू म्हणून - वरील (२) पाहा
महाराष्ट्रीय म्हणून - वरील (३) पाहा
मराठी म्हणून - वरील (४) पाहा