सन्माननीय ऋचाजी,
असे काही समजू नका. मी आपल्याला सांगणारा कोणी नाही म्हणून सांगीतले नाही.
आपल्याला कुठल्या शेरा (रां) चा अर्थ लागला नाही ते कळल्यास जरूर माझ्या पद्धतीने अर्थ सांगेन. सर्वच गझल अनाकलनीय वाटली तरी मला त्याचे काही वाटणार नाही.
असो.
मी असे गृहीत धरतो की कुठल्याच शेराचा अर्थ आपल्याला भिडला नाही. म्हणून सगळ्या गझलेचा अर्था ( मला अभिप्रेत ) इथे देत आहे.
काळ मरण-बी पिकवत आहे
वेग न कळण्या इतपत आहे -
मरणाचे बीज पीकवण्याचे काळाचे कार्य अव्याहत चालू आहे. पण ते नेमके केव्हा पिकणार हे (कुणालाच ) माहीत नाही. पिकण्याचा वेग न कळण्या इतपत आहे. ( सहसा वेगाच्याबाबतीत - सहन होण्याइतपत वगैरे शब्दप्रयोग होतात, म्ह्णून 'न कळण्या इतपत' असे म्हंटले. )
बाळग निष्ठा, जीवन बोले
शिकायचा तो शिकवत आहे
एक दिवस आयुष्य आपल्या मृत्यूच्या हवाली करून मोकळे होणार. पण जागोजागी येणाऱ्या आव्हानांमध्ये मात्र आपल्याला शिकवले जाते की तत्त्वांवर/इश्वरावर वगैरे निष्ठा बाळगा. स्वतः जीवनच निष्ठावान नाही अन आपल्याला मात्र निष्ठा शिकवते. ( माझ्या स्वतःच्या मताप्रमाणे या गझलेतील हा शेर मला आवडणाऱ्या काही शेरांपैकी एक आहे )
अधेमध्ये भेटून जातो पण
श्वास शायरी टिकवत आहे
-आता अंत जवळ आला आहे. श्वास आधीसारखा नित्य वेगाने किंवा खात्रीलायकरीत्या येतोच असे नाही. मधुनच येतो अन जीव टिकवून धरतो. पण त्याहबरोबर तो शायरी पण टिकवून टःएवतो. ( शायरी ही माझी पॅशन आहे हे सांगण्यासाठी हा शेर )
तिचे नि माझे रहस्य होते
जे सध्या ती मिरवत आहे
एखाद्याला प्रेग्नंसी वाटल्यास मी काही करू शकत नाही. मात्र तसे नाही. आणखीन एकाला माझ्या सौंदर्याची भुरळ पाडून, माझ्या प्रेमात वेडे करून बरबाद केले असा अभिमान आज ती मिरवत आहे. पण माझी अशी कल्पना होती की ते फक्त माझे अन तिचे रहस्य आहे. ती आता ते भर बाजारात ( प्रेमाच्या ) तिच्या विजयाची निशाणी म्हणून मिरवत आहे.
अत्यवस्थ नात्यामध्ये त्या
सांग धुगधुगी कितपत आहे?
गझलेमध्ये एक शेर कधीच दुसऱ्या शेरावर अवलंबून नसतो. मात्र एकाच विषयावर दोन शेर असू शकतात, जे बेसिकली स्वतंत्र असतात. या शेरात मी तिला विचारतो आहे की तिच्यामते आज त्या रहस्यामधे, त्या नात्यामध्ये किती अर्थ राहिला आहे. एकदा ते कळले की आपले निर्णय घ्यायला मोकळे. उगाच आशा ठेवायची अन ती कधी ढुंकून बघणार नाही, असले त्रास नकोत.
कर्ज काढुनी सबुरीकडुनी
अपमानांना फिटवत आहे
सबुरीच्या पतपेढीकडून कर्ज काढून लोकांकडून जे अपमान लाभले होते ते फिटवत आहे. सरळ सांगायचे तर सर्व अपमानांना मी सबुरीने झेलत आहे.
उत्साहावर शिंपड आळस
उगाच पडला खितपत आहे - या शेराचा अर्थ वरील प्रतिसादात दिलाच आहे.
तिने दिलेला शब्द पाळला
शब्द आजही फिरवत आहे
- ती प्रेमात मश्गूल असताना जेव्हा मी विचारायचो की कायमची माझीच राहशील ना तेव्हा ती मला चिडवून म्हणायची की तसे काही नाही, मी आज दिलेले वचन उद्या मोडेनही. ती तशीच वागताना आज दिसत आहे. तिने वचन मोडण्याचा शब्द दिलेला होता. आज ती म्हणते की तिचे कधी प्रेम नव्हतेच. ते फक्त माझे तिच्यावर प्रेम होते. असा तिचा शब्द ती फिरवत आहे.
खर्च सुखांना करते कोणी
पगार कोणी मिळवत आहे -
हा एक सहज समजण्यासारखा शेर वाटायला हरकत नाही.
रंगपंचमी आठवणींची
पात्र मनाचे भिजवत आहे
आता या कोरड्या एकाकी मनात ( मनाला नदी समजले तर मनाच्या पात्रात ) ओलाव्याची काहीही निशाणी नाही. परंतु गतकाळच्या आठवणी जेव्हा जमून रंगपंचमी खेळतात तेव्हा ते पात्र भरून वाहते. पण तेव्हढ्यापुरतेच!
आता आपल्याला ही गझल कशी वाटली ते कृपया सांगावेत. धन्यवाद!