सदर गझलेत शेराच्या अर्थापैकी जवळ जवळ ४०% अर्थ रदीफेमध्ये बसत आहे. रदीफ आहे 'चुकले असावे'!

आता 'चुकले' या शब्दामध्ये भूतकाळामध्ये आपल्याकडून काहीतरी ठीक पद्धतीने झाले नाही याचे व्यक्तीकरण आहे. तर 'असावे' मध्ये शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेः बहुतेक माझेच ( किंवा माणसाचेच वगैरे ) चुकले असणार!

तुलनाः

आयुष्य तेच आहे.. अन हाच पेच आहे - यामध्ये 'आहे' मुळे उरलेल्या पाच शब्दांमध्ये काय सांगायचे हे ठरवण्याचा वाव मिळतो.

वागणे चुकले असावे .. बोलणे चुकले असावे - यामध्ये 'चुकले असावे' या लांबलचक ( वृत्ताच्या मानाने ) रदीफेमुळे तो वाव जरी मिळत नसला तरी मुळातच रदीफेमध्ये इतका अर्थ सामावलेला आहे ( 'आहे'च्या तुलनेमध्ये ) की उरलेल्या शब्दात काय सांगायचे याचा भरपूर वाव ती रदीफ देते. खरे तर 'आहे' पेक्षा बराच जास्त वाव देते असे माझे मत आहे. याच्या पुष्टीकरणासाठी जयंता साहेबांनी न वापरलेले काफिया खाली देत आहे.

थांबणे, पाहणे, राहणे, टाळणे, काढणे, भांडणे, ओतणे, संपणे व इतर कितीतरी!

माझ्यामतेः  लहान बहरातील गझलेमुळे शायरावर येऊ शकणारी बंधने वा मर्यादा या गझलेत येत नाहीत.

बाकी - इतर लहान गझलांमध्ये तश्या मर्यादा येतात हे खरे आहे. पण लहान बहर निवडण्याचे ( किंवा मुळातच बहर निवडण्याचे ) मूळ कारणच हे असायला हवे की जो मुद्दा आहे तो त्या बहरेत बसतो व त्याच बहरेत खुलतो.

उदाहरणार्थः याच गझलेचा शेर घेऊ.

आज का होकार आला?
मागणे चुकले असावे

यात, होकार आला त्या अर्थी मागण्यातच चूक असणार, कारण अन्यथा कधीच होकार येत नाही असा मुद्दा आहे.

हा मुद्दा याच बहरेत बसतो अन खुलतोही!

पण मुद्दा जर असा असेलः - जेव्हा ती अगदी होकार द्यायच्या मनस्थितीमध्ये होती नेमके तेव्हाच मी मागायला चुकलो. कारण ती होकार देईल याची मला कधी शक्यताच वाटायची नाही. एरवी मी अगदी बरोबर मागणी करायला जायचो पण तेव्हा ती तयार नसायची. एवढे म्हणायचे असेल तर वृत्त बदलावे लागेल.

होकार मी तिचा तो समजायलाच चुकलो
सवयीमुळे 'हवे ते' मागायलाच चुकलो

ही माझी नम्र मते आहेत. तज्ञांनी मतप्रदर्शन करावे अशी विनंती! धन्यवाद!