वरील प्रस्ताव आणि त्यावरच्या प्रतिसादांचा एकूण सूर असा दिसतोय की आजकाल सर्वसाधारणपणे डॉक्टर लोकांची निदान कौशल्ये कमी झाली आहेत आणि आणि बाहेर वेगवेगळ्या चाचण्या करवून पेशंटला गंडवण्याचीच वृत्ती वाढत आहे.
मला काही हे तितकसं पटत नाही. आजही माझ्या मते सज्जन आणि सचोटीच्या डॉक्टरांचं प्रमाण पूर्वी इतकंच आहे (उलट कदाचित स्पर्धेमुळे हे प्रमाण वाढलंही असेल) आणि आजही त्यांना त्यांच्या पेशंटची तेवढीच काळजी असते जेवढी पूर्वी होती. पण एक छोटा फरक आहे की पूर्वी डॉक्टर हा जणू कुटुंबातला एक घटकच असायचा. माझ्या लहानपणी आमचे फॅमिली डॉक्टर आमच्या वाड्यातल्या सगळ्यांना आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांना पण ओळखायचे! हे डॉक्टर जास्त सेवाभावी वृत्तीनं काम करायचे, यात पैसे मिळवणे हा भाग अगदी दुय्यम असायचा. आता डॉक्टर्स जास्त व्यावसायिक झाले आहेत. वैयक्तिक नाती जोपासण्याची आता त्यांना गरज वाटत नाही आणि त्यांना तेवढा वेळही नाही. वाढत्या वैद्यकीय ज्ञानानं त्यांची निदान कौशल्य वाढायला मदतच झाली आहे. वैद्यकीय शास्त्रही खूप विकसीत झालंय आणि डॉक्टर लोक संपूर्णपणे स्वतःच्या निदान कौशल्यावर अवलंबून न राहता शास्त्राची, तंत्रज्ञानाची मदत घेतात आणि माझ्या मते तरी यात गैर काहीच नाही. बऱ्याच वेळेस या सगळ्या टेस्टस फक्त प्रिकॉशनरी मेजर म्हणूनच केलेल्या असतात. पण यातून पेशंटच्या तब्बेतीची संपूर्ण माहिती डॉक्टरला मिळते आणि ट्रीटमेंट जास्त आत्मविश्वासानं करता येते. एक छोटसं उदाहरण सांगायचं झालं तर खोकला झाल्यावर आपण डॉक्टरकडे गेलो आणि त्याने ब्लड टेस्ट करून यायला सांगितलं (आणि त्यातही ब्लड टेस्ट मध्ये काहीच गैर सापडलं नाही) तर आपण लगेच अर्थ काढतो की डॉक्टरचं पॅथॉलॉजिस्ट बरोबर साटंलोटं असणार. पण इओसिनोफिल्स नावाच्या पांढऱ्या रक्तपेशी असतात आणि यांचं रक्तातलं प्रमाण घटलं तर खोकला होतो. या इओसिनोफिल्सचं रक्तातलं प्रमाण ब्लड टेस्ट न करता कितीही निष्णात डॉक्टरला आपोआप कसं कळू शकेल. त्यामुळे साधारण खोकल्याचं औषध देऊन खोकला कमी न झाल्यास मगच ब्लड टेस्ट करण्यापेक्षा आधीच ती करून योग्य उपचार योजना करणं चांगलं नाही का?
ही नवीन निदान पद्धती नक्कीच चांगली आहे याचं आणखी एक उत्तम द्योतक म्हणजे भारतातला झपाट्यानं कमी होत असलेला सरासरी मृत्यू दर. २००० साली हा दर हजारी नऊच्या आसपास होता आज तोच सहाच्या जवळ आहे.