इतकं रडायची गरज आता उरलेली नाही, असे वाटते.
पूर्वी जेव्हा माणूस टोळ्यांमधे राहत होता तेव्हा संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने ते खाते पुरुषाकडे होते. याचा नंतर व्यवस्थित फायदा घेतला गेला आणि पुरुष प्रधान संस्कृती वगैरे निमाण झाली हे मान्य. साधारण मध्ययुगीन कालखण्डापर्यंत ही परिस्थिती अशीच राहिली (जाणकारांनी मदत करावी). या काळांत स्त्रियांवर अनेक बंधनं लादली गेली.
मध्ययुगानंतर मात्र परिस्थिती बदलली. महात्मा फुले, सवित्रीबाई फुले, आगरकर, दयानंद सरस्वती आदी समाजसुधारकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवला. रुढी, परंपरा, चालिरितींचा पगडा असलेल्या त्या काळात सर्व प्रकारचा रोष पत्करून त्यांनी घडवून आणलेली क्रांती थोर आहे.
असो. तर माझा मुद्दा असा, की उगाचच कसले तरी दिन वगैरे साजरे करून स्वतःला वेगळे काढण्यापेक्षा आणि पर्यायाने स्त्री-पुरुष असमानतेलाच हातभार लावण्यापेक्षा स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जे काही करणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
दुसरे म्हणजे मेधा पाटकर, लता मंगेशकर, कल्पना चावला यांसारख्या महान व्यक्ती स्त्री अथवा पुरुषही निर्माण होतच असतात. ह्या लोकांना परिस्थितीशी फारसे देणे घेणे नसते. कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतातच करतात. प्रश्न आहे तो आपल्यासारख्या सामान्य माणसांचा. आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायलाच हवे. मग स्त्री किंवा पुरुष हा मुद्दा अलहिदा, असे मला वाटते.
आपल्या लेखात आपण म्हटले आहे,
फार फार वर्षांपूर्वी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा होता. त्या काळातील स्त्री विद्वान होती, युद्धकुशल, राजकारणपटू होती. अनेक कला आणि विद्या ती मध्ये सामावलेल्या होत्या.
कधी? ह्या प्रकारची परिस्थिती फार फार काय १०० वर्षांपूर्वीपर्यंतसुद्धा निदान भारतात तरी नक्कीच नव्हती. स्त्रियांचा दर्जा कायम दुय्यमच होता. ती उपभोग्य वस्तूच होती. आत्ताच्या परिस्थितीशी तुलना करता त्या काळच्या स्त्रियांचा दर्जा आणि मिळणारी वागणूक ही स्त्रियांसाठी 'माणूस' म्हणून अपमानास्पदच होती. वेगवेगळ्या सत्ताधीशांमध्ये विभागला गेलेला आपला देश आणि सततची युद्धे यामुळे सीमांचे संरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला. ह्यात सहाजिकच स्त्रियांचे स्थान दुय्यम झाले. अर्थात हे योग्य नक्कीच नाही.
स्त्रियांशी असलेल्या अपमानास्पद वागणुकीची फार फार वषापूर्वीची काही उदाहरणे :
१) राजाची पत्नी एक नसे. त्याला अनेक राण्या असत. शिवाय दासी ह्या उपभोगासाठी असतच. माझ्या मते, आत्ताच्या परिस्थितीशी तुलना करता, आपल्या व्यक्तिगत नात्याशी इतर अनेक जण तेवढ्याच अधिकाराने जोडलेले असणं ह्यासारखं अपमानकारक कुणासाठीही दुसरं काहीही असू शकत नाही.
२) आपल्या शत्रूला नष्ट करण्यासाठी विषकन्यांचा वापर.
३) बुद्धाने धर्माची स्थापना केली तेव्हा त्यात स्त्रियांना स्थान नव्हते. पण त्याच्या आई अर्थात मावशीने आणि बहिणीने हट्ट केला म्हणून भिक्षुणींचा संघ स्थापन झाला. मात्र भिक्षुणींसाठी बुद्धाने घालून दिलेले नियम हे बौद्ध भिक्षुंपेक्षा जास्त कडक आहेत आणि बौद्ध धर्माची लोकप्रियता कमी होण्यामागे किंबहुना त्याचा अस्त होण्यामागे भिक्षुणींचा संघच कारणीभूत झाला आहे. (बौद्ध धर्माचा विषय आला म्हणून ओघानेच ही माहिती देत आहे. मी स्त्री मुक्ती विरोधी आहे असा गैरसमज कृपया होऊ देऊ नये.)
४) सगळ्यात कहर म्हणजे आपल्या घरी आलेल्या अतिथीला (अनोळखी असला तरीही) आदरातिथ्याचा भाग म्हणून आपली पत्नी (वापरावयास) देण्याची पद्धत रूढ होती आणि ते अयोग्यही मानले जात नव्हते.
हे सांगण्याचा हेतू इतकाच की उगाचच फार फार वर्षांपूर्वी आपल्याकडे अतिशय आदर्श असे वातावरण होते पर्यायाने आत्ता अपेक्षित असलेले अधिकार आणि स्वातंत्र्य स्त्रियांना होतेच अशा समजात कृपया राहू नये. पूर्वीच्या मानाने स्त्रियांची आत्ताची स्थिती फारच उत्तम आहे आणि ह्याला स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेली चळवळ कारणीभूत आहे.
तात्पर्य :
हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरांमध्ये पूर्णपणे बदल घडून यायला वेळ लागणारच. तेव्हढा तो दिला गेलाच पाहिजे. उगाचच स्त्री मुक्तीचे गोडवे गात बसण्यापेक्षा आणि स्वतःला वेगळे काढण्यापेक्षा बदलाची प्रक्रिया लवकर घडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. परिस्थितीत बदल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत. रडत बसून काही उपयोग नाही.