हे बरोबर. पण निखिलच्या कोणत्या म्हणण्याला हे उत्तर आहे? का हा स्वतंत्र मुद्दा आहे? स्वतंत्र मुद्दा असेल तर ठीक आहे. पण तसं नसेल तर त्याने न मांडलेले मुद्दे खोडून काढण्यात का वेळ का घालवता?स्त्रियांवर अन्याय होत आला आहे हे तर खरच आहे... आता तुम्ही जी क्रांती वगैरे म्हणत आहात ती फक्त समाजातील उच्च्भ्रू वर्गापुरतीच आहे (अजूनही), स्त्री शिक्षित झाली, नोकरी करत असली म्हणजे ती स्वतंत्र आहे हे मानणे चुक आहे.
अति प्राचीन काली म्हणजे गार्गी, मैत्रेयी इ. नावे तुम्हाला कदाचित परिचित असतील.
गार्गी मैत्रेयी व्यतिरिक्त इतर काही नावे तुम्हाला परिचित आहेत का हो? असतील तर जरूर सांगा. बहुधा सापाडायची नाहीत. कारण भारताचा सांस्कृतिक इतिहास वेगळीच कहाणी सांगतो. गार्गी मैत्रेयी या त्यांच्या काळातले अपवाद होत्या. आणि त्यातही मैत्रेयीची गोष्ट तुम्हाला पूर्ण माहित आहे का?
तिला वेदाभ्यास करायचा होता. पण कोणा पुरुषाला गुरू करून तिने त्याच्या घरी राहण्याला समाजाचा विरोध होता. म्हणून खूप काळ तिची ही इच्छा अपुरीच राहिली. मग याज्ञवल्क्याने तिच्याशी विवाह करून तिला शिष्या म्हणून स्वीकारलं. याज्ञवल्क्य "ऋषींना"ही पूर्वी एक पत्नी होतीच. हा त्यांचा दुसरा विवाह! मैत्रेयीने आपल्या बुद्धिबलावर पांडित्य मिळवलं आणि ते तिचा गुरू आणि पती असलेल्या याज्ञवल्क्यापेक्षा काकणभर जास्त होतं ही एक गोष्ट अभिमानास्पद आहे. मात्र जेव्हा तिने बुद्धीची मोठी भरारी घेतली आणि याज्ञवल्क्याच्या आकलनकक्षेच्या बाहेरचे प्रश्न त्याला विचारले तेव्हा ते असह्य होऊन त्याने तिला आता एक अक्षर पुढे बोललीस तर तुझ्या डोक्याची हजारो शकलं होतील असं उत्तर देऊन गप्प केलं. ही गोष्ट वेदांतच सांगितलेली आहे.
अर्धवट कथा लक्षात ठेवून भ्रमात राहू नका एवढाच सांगायचा मुद्दा आहे.
त्या काळात यज्ञाचे पौरोहित्य सुद्धा स्त्रिया करित असत.
सोदाहरण / सप्रमाण सिद्ध करा.
माहित असलेले उदाहरण म्हणजे रामायणातील कैकेयी जी दशरथाबरोबर रणांगणावर गेली होती आणि जेव्हा दशरथ जख्मी झाला तेव्हा त्यचे प्राण तिनेच वाचवले होते.
माहित असलेले उदाहरण हाच कळीचा शब्द आहे. आणखी उदाहरणे मिळतात का पाहा. खरंतर कैकेयीचं उदाहरणही तिच्या दोन वरांच्या कथेला पार्श्वभूमी म्हणूनच रचलेलं असावं असं मला तरी वाटतं. पण तो मुद्दा निराळा आहे.
तात्पर्य, या विलक्षण स्त्रिया होत्या, निःसंशय. पण समाजाने त्यांनाही फार सुखाने स्वीकारले नाही. त्यांचा स्फुल्लिंग इतका तेजस्वी होता की त्या समाजाला पुरून उरल्या आणि आपापल्या काळातल्या महान स्त्रिया ठरल्या. पण इतर स्त्रियांची हीच पद्धत असती तर त्या महान ठरल्या असत्या का? त्या अपवाद होत्या म्हणूनच मोठ्या ठरल्या.
मुद्दा एवढाच की पूर्वी इथे कसं छान छान होतं आणि आता सगळं बिघडलंय असा दृष्टिकोण बाळगू नका. पूर्वीपेक्षा परिस्थिती बरी आहे ही खरी गोष्ट आहे. आज एक गार्गी मैत्रेयी नव्हेत तर हजारो घरांतल्या लाखो मुली शिकतात. गरजेपुरते/पोटापुरते का होईना पैसे कमावतात आणि त्यानिमित्ताने जगाचा अनुभव घेतात. त्याने त्या स्वतंत्र झाल्या असं कोणीच समजणार नाही, पण स्त्रीच्या अनुभवविश्वात होणारा बदलच तिला स्वातंत्र्याप्रत नेऊ शकतो. हेही खरं आहे ना? मग त्या मार्गावर हे पाऊल पडणं महत्त्वाचं नाही का?
आणि झपाट्याने होणारी क्रांती ही क्षणभंगूर असते. पण सावकाश होणारी उत्क्रांती चिरकाल टिकते. त्यामुळे उत्क्रांतीचा मार्ग श्रेयस्कर असं मलाही वाटतं. त्या मार्गावर चालत राहणं आणि आग्रहाने हक्क बजावणं हे ज्यांना कळतंय त्यांनी केलं पाहिजे; इतर स्त्रियांना त्याबाबत शक्य ती सर्व मदतही करावीच आणि तुमच्या माझ्यासारख्या स्त्रिया ते करतही असतात.
कायद्याने मताधिकार, आरक्षण, समान रोजगार संधी, समान वारसाहक्क हे मान्य केलंच आहे. पण कायदा करून माणसं रातोरात बदलती तर जग किती वेगळं झालं असतं. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी ही एका मर्यादेतच राहते. हे कटू सत्य आहे. पण त्याही बाबतीत जागरूकता वाढत आहे. चित्र पालटत आहे. याचा वेग न कळण्याइतपत कमी आहे, पण जे आहे तेही पाहायला हवंच ना.
खेड्यापाड्यातल्या स्त्रिया आज निर्मल ग्राम, दारूबंदी, बचतगट यासारखे चांगले उपक्रम यशस्वी करत आहेत. यातही थोडा देखावा आहेच. मला उगाच सोनेरी चित्र रंगवायचं नाही. पण ह्या उपक्रमांचं यश हे गावागावात आवर्जून दिसून येणारं आहे. ते नाकारता तर येत नाही ना? शिवाय नेहमीचं काम त्यांचं चालू असतंच!
गावांत, शहरांत, आदिवासी भागांत सर्वत्रच अनेक सामाजिक चळवळी आणि आंदोलनं ही त्यांतील स्त्रियांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक तीव्र झालेली आहेत. केवळ स्त्री नेत्याच नव्हे तर त्या आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या सामान्य स्त्रियांचा ह्यात मोठा हातभार असतो हे विसरून कसं चालेल?
शहरांमधून पोलीस, सैन्य, राजकारण, सनदी अधिकारी इ. क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे. संरक्षणाची जबाबदारीही पेलू शकण्याची तयारी त्या करत आहेत.
नव्या काळाची एक दुष्ट देणगी म्हणजे एकट्या पालक असलेल्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. त्या पतीच्या मदतीशिवाय चांगली मुले वाढवत आहेतच ना? का माता ही स्त्रीची पारंपरिक भूमिका असल्याने हे यश नको धरूयात जमेस?
एक इंदिरा, एक प्रतिभा, एक सानिया, एक सोनिया, एक माधुरी, एक मेधा यांची उदाहरणं विसरा एकवेळ पण सभोवार दिसणाऱ्या अनेक मुली शाळाकॉलेजांत का होईना, पण वेगवेगळे खेळ खेळताना, नाटका सिनेमांत छोटीमोठी कामं करताना, छोट्या मोठ्या सेवासंस्थांतून कामं करताना, वेगवेगळ्या कलांचं शिक्षण घेऊन समाजाभिमुख सादरीकरण करताना, लाटणी मोर्चे काढताना दिसतातच ना? हा बदल चांगला आहे का नाही?
स्त्रिया गाड्या चालवतात, स्वतःच्या बळावर घर, गाडी वगैरे खरेदी करतात. आणि अशा स्त्रियांची संख्या शहरांतून तरी नगण्य मानण्याइतकी कमी निश्चित नाही.
डॉक्टर इंजिनियर मॅनेजर सारख्या कामांतही शहरांतून बऱ्याच प्रमाणात आणि थोड्याफार प्रमाणात गावांतून अनेक स्त्रिया शिरलेल्या आहेतच ना.
नाण्याची ही बाजूही पाहायला हवी. आहे हे पुरेसं आहे असं मला चुकूनही म्हणायचं नाही. पण सकारात्मक गोष्टीही लक्षात घ्याव्यात आणि मग नव्याने हुरूप घेऊन इथून पुढे कसं जायचं याचा विचार करायला हवा. एवढीच अपेक्षा आहे.