१. दीपक : हे विशेषण नाही. संस्कृतातही. दीप् असे क्रियापद (धातु) आहे. त्याचा अर्थ प्रकाशणे. दीपक हे या धातूचे प्रयोजक कर्तृवाचक नाम आहे. म्हणजे जो दुसऱ्याला प्रकाशित करतो (दिपवतो) तो दीपक. नेत्रदीपक म्हणजे जो "डोळ्यांना दिपवतो तो" कुलदीपक म्हणजे "जो कुलाला प्रकाशित करतो तो" (प्रकाशित करतो, प्रसिद्ध करतो, पुधे नेतो असे लाक्षणिक अर्थ समजावे लागतात.) हे शब्द अगदी योग्य आहेत.
२. संपन्न : सम् + पद् या धातूपासून निर्माण होणारे क. भू. धा. वि. या धातूचा अर्थ पार पडणे, पूर्ण होणे असा आहे. हा शब्द संस्कृतातून मराठी आणि हिंदीत आलेला तत्सम शब्द आहे. आणि बराच प्रचलितही आहे. याचा वापर मला तरी गैर वाटत नाही.
३. विदेशी : या शब्दाबाबत यापूर्वी चांगले संदर्भ देऊन स्पष्टीकरण झालेले आहे. सहमत आहे. त्यात पुन्हा शिरत नाही.
४. सुविधा : हा शब्द संस्कृतातून मराठी आणि हिंदीत आलेला तत्सम शब्द आहे. आणि बराच प्रचलितही आहे. याचा वापर मला तरी गैर वाटत नाही.
५. दर्शक : दर्शक हा शब्द मराठीत प्रेक्षक या अर्थाने वापरला जाऊ नये याच्याशी सहमत. पण हिंदीत तो चुकीच्या अर्थाने वापरला जातो. असे म्हणणे योग्य नाही. तो शब्द हिंदीत संस्कृतपेक्षा वेगळ्या अर्थाने रूढ झाला असे म्हणायला हवे. कारण भाषेची योग्यायोग्यता ठरवण्याचा सर्वात मोठा निकष तिचा वापर हाच असतो. अर्थशुद्धता हा नव्हे.
६. अजय : अजेय चा अपभ्रंश आहे.
७. सचिन : शची + इंद्र वरून दिलेली व्युत्पत्ती वाचली. असे असेल तर बंगालीत तरी त्याचा शचीन होईल. सचिन नव्हे. अर्थात बंगालीतून मराठीत येताना हा बदल होऊ शकतोच. या शब्दाची एक आणखी व्युत्पत्ती माहित आहे. ती सांगते.
संस्कृतात चिह्न या शब्दाचा अर्थ केवळ खूण असा होत नाही. त्याचा संदर्भानुसार सौंदर्यलक्षणे, राजलक्ष्मीची लक्षणे, शुभशकुन, असा अर्थ होत असतो. सचिह्न म्हणजे चिह्नांनी युक्त असा. फलज्योतिषात सचिह्न याचा अर्थ सुंदर, राजयोगी, शुभशकुनी असा होतो. त्या सचिह्न या शब्दाचा सचिन हा अपवाद आहे.
८. सुचिता : शुचिता / सुचेता चा अपभ्रंश हे योग्यच आहे. पण प्रत्यक्ष सुचिता या शब्दालाही संस्कृतात उत्तम अर्थ आहे. "चि" धातूचा अर्थ रचणे. (लाकडांची रचना या अर्थी चिता शब्दही यापासूनच झाला आहे हे खरे.) चिता म्हणजे रचलेली गोष्ट / रचना. सु-चिता म्हणजे. चांगल्या तऱ्हेने रचलेली गोष्ट. चांगली रचना. रचना, कल्पना ही नावेही साधारणपणे त्याच अर्थाची. एवढा विचार कोणी सुचिता हे नाव ठेवताना / लिहिताना करत असेल असे नाही. पण त्याचा अर्थ लावता येतो हे खरे.
९. अनिकेत : अनिकेत म्हणजे शब्दशः बेघर हे बरोबर आहे. पण ही एक थोडी धार्मिक थोडी आध्यात्मिक संकल्पना म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. अनिकेत म्हणजे ज्याला घर नाही असा. याचे दुहेरी अर्थ होऊ शकतात.
अ. घर असलेला म्हणजे गृहस्थाश्रमी माणूस. अनिकेत म्हणजे ब्रह्मचर्यपालन करणारा, घरादाराची बंधने नसणारा, ईश्वरचिंतनात मग्न असलेला निःसंग, सर्वसंगपरित्यागी माणूस.
ब. ज्याला घर आहे त्याला त्या घराची मर्यादा आहे. ज्याला घर नाही त्याला कसलीही मर्यादा नाही. तो अमर्याद अथांग असतो. असा अर्थ समजावा.
अशाच प्रकारचा दिगंबर शब्द आहे. त्याचा अर्थ "दिशांची वस्त्रे घालणारा" असा आहे. लौकिकार्थ पाहू जाता नग्न असा दिसतो. पण धार्मिक अर्थ पाहू जाता असे दिसते की जो त्या वस्त्राचाही मोह बाळगत नाही. किंवा लज्जारक्षण केले पाहिजे यापुरतेही ज्याला शरीराचे भान नाही असा अशारीर ब्रह्मानंदात लीन झालेला मनुष्य म्हणजे दिगंबर. अनिकेत, दिगंबर ही नावे अशा आध्यात्मिक अर्थानेच ठेवली जातात. त्यात अयोग्य असे काही नाही.
१०. संभावना : संभावना ह्या शब्दाचा अर्थ मराठीत 'निंदा' असा होतो तर हिंदीमध्ये 'शक्यता' असा होतो. असे वरदा यांनी वर म्हटले आहे. या शब्दाचा अर्थ संस्कृतात सन्मान / सत्कार करणे असा होतो. त्यावरून उपहासाने हा शब्द एखाद्याची किंमत करणे, लायकी काढणे, टीका करणे, निंदा करणे या अर्थाने मराठीत रूढ झाला आहे. संभव या शब्दाचा संस्कृत अर्थ जन्म असा आहे. तो लक्षणेने शक्यता या अर्थी संस्कृत, मराठी हिंदी सगळीकडेच वापरला जातो. पण संभावना हा शब्द मात्र शक्यता अर्थी केवळ हिंदीतच दिसतो. आजकाल कधीकधी मराठीतही दिसतो.
११. अजून : हा शब्द कालवाचक आहे हे बरोबर पण तो अधिक, आणखी या अर्थानेही तितकाच वापरला जातो. त्या अर्थाने तो चूक नाही. वेगवेगळ्या प्रदेशात एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जाऊ शकतो. कारण वर म्हटल्याप्रमाणे भाषेची योग्यायोग्यता ठरवण्याचा सर्वात मोठा निकष तिचा वापर हाच असतो. अर्थशुद्धता हा भाषेची योग्यायोग्यता ठरवण्याचा सर्वात मोठा निकष तिचा वापर हाच असतो. अर्थशुद्धता हा नव्हे.
१२. सुस्वागतम् : हा शब्द योग्य आहे. एक संस्कृतच्या आधाराने आणि एक सामान्य भाषाशास्त्राच्या अधाराने अशा दोन प्रकारे या शब्दाची संगती लावता येते.
अ. संस्कृतच्या आधारे : आगत = येण्याची क्रिया, येणे, आगमन. एखाद्या पाहुण्याच्या येण्याने आनंद झाला की (किंवा नाइलाजाने) आपण म्हणतो ना, "बरं झालं आलात!" "तुम्ही आला? वा छान!" अगदी त्याच अर्थाचा संस्कृत वाक्प्रचार आहे "स्वागतम्" यजमान पाहुण्याला "स्वागतम्" असे म्हणतो त्याचा शब्दशः अर्थ "तुम्ही आलात, छान झाले." असा आहे.
एखाद्याचे आपण स्वागत करतो म्हणजे हे. (सुस्वागतम् करत नाही.)
आणि तो झालेला आनंद यजमान पाहुण्याची चांगली सरबराई करून व्यक्त करतो. म्हणून त्या सरबराईलाही लक्षणेने स्वागत असा अर्थ प्राप्त होतो. यजमानाने केलेल्या स्वागताने तृप्त / प्रसन्न होऊन पाहुणा "तुम्ही आमचे चांगले (सु) स्वागत केलेत" असे म्हणतो. त्या अर्थाचा मुळात पाहुण्याने उच्चारण्याचा वाक्प्रचार म्हणजे "सुस्वागतम्" असा आहे. याची परंपरा वेदकाळापासूनची आहे असे वाचल्याचे अंधूकसे आठवते. शहानिशा केली पाहिजे.
ब. सुस्वागतम् हा परंपरेत उपलब्ध असलेला शब्द मराठीने स्वागतम् या अर्थाने स्वीकारला आणि आता तो तसाच रूढ झाला. आणि रूढ झालाच आहे तर तो अयोग्य आहे असे म्हणणे हे भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रतिगामी आहे.