धन्यवाद देशमुख साहेब.  आपल्या प्रश्नांची माझ्या माहितीप्रमाणे उत्तरं अशी...

डॉलर घसरतोय असं म्हटलं जातयं.

डॉलर घसरतोय असं सध्या कुणी म्हणत असेल तर ते चूकच आहे.   रुपया घसरतोय.   माझ्याही वरच्या प्रतिसादात मी रुपयाच्या तुलनेत डॉलर वर चढतोय, डॉलर महाग होतोय असंच म्हटलंय.  

मागे तेल उत्पादक देशांनी डॉलरऐवजी इतर चलनात व्यवहार करायला सुरुवात केल्याचे वाचले. त्याचा हा परीणाम आहे का?

अमेरिकेनं अशी सक्ती केली होती की तेलाची खरेदी विक्री डॉलर मध्येच झाली पाहिजे.  आणि स्वतः च्या तेल खरेदीसाठी अमेरिका, आवश्यक तेवढ्या डॉलरची छपाई करायची.  म्हणजे फक्त नोटांच्या छपाईच्या किंमतीत अमेरिकेला तेल मिळायला लागलं.  तेल उत्पादक देशांना अमेरिकेचा हा चावटपणा लक्षात आल्यामुळे त्यांनी डॉलरवर बंदी घातली होती. 

भविष्यात डॉलरला कोणिही विचारणार नाही असे होइल का?  

अमेरिकेची परिस्थिती एवढी वाईट होईल असं फारच अवघड आहे.  पण काही कारणानी अमेरिकेची इकॉनॉमी पूर्ण ढासळली आणि समजा तो देश गरिबीच्या खाईत लोटला गेला तरच डॉलरला कुणी विचारणार नाही असं होईल.  पाकिस्तानी रुपयाला आज जगात कुणी विचारतं का? काहीसं तसंच.

रुपयाची (किंवा इतर चलनाची किंमत) जशी १९३५-३६ च्या दरम्यान १ डॉलर = ४०, ००० जर्मन मार्क झाली होती तसं काही घडेल का?

 ३४-३५ च्या सुमारास जर्मनीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. १९३०च्या ग्रेट डिप्रेशनचा जर्मनीला जोरदार फटका बसला होता.  बेकारी आणि महागाई आभाळाला भिडली होती.  वायमार सरकार आणि चान्सेलर हाईनरिश ब्र्यूनिंग जर्मनीला या अवस्थेत वाचवूही शकत नव्हते आणि राजकीय शत्रूंसमोर पुरेसा टिकावही धरू शकत नव्हते.   १९३३मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाला आणि १९३४ मध्ये सर्वेसर्वाः. (फ्यूहरर उंड राईश्स्कांत्सलर).  १९३६ मध्ये जर्मन इकॉनॉमी अगदी रसातळाला जाऊन पोहोचली होती आणि याच सुमारास दॉईशं मार्क तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे आपटला होता.  १९३६ मध्ये हिटलरनं चौवार्षिक (आपल्याकडे पंचवार्षिक योजना असते तशी) योजना आखली.  हेरमान ग्योरिंगला त्या योजनेचा प्रमुख बनवलं आणि तिथूनच थर्ड राईशचा उदय झाला!

तर थोडक्यात सांगायचं तर तितकी बिकट अवस्था उद्या भारताची झाली तर रुपयाची अवस्थाही तशीच बिकट होईल. 

यावेळी जवळ डॉलर ठेवणे योग्य आहे की कोरिअन वोन?

वोनची घसरण चालू असे पर्यंत डॉलर जवळ ठेवा.  रोजच्या रोज डॉलर वोनचे (आणि डॉलरचे इतर चलनां बरोबरचे) दर कसे बदलतायत या कडे लक्ष ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला नक्की खात्री वाटेल की वोनची घसरण थांबली आहे आणि आता डॉलर घसरायला लागलाय त्यावेळेस डॉलर वोन मध्ये बदलायला सुरवात करा.  दुसरं म्हणजे सध्या भारतात पैसे पाठवणंही तुम्हाला फायदेशीर आहे कारण कमी डॉलरमध्ये जास्त रुपये इथे पाठवू शकाल!!

अर्थात मला तुम्हाला याबरोबर आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे. मी अर्थशास्त्रातला किंवा या आंतर राष्ट्रीय व्यवहारांमधला कुणीही तज्ञ नाही.  फक्त माझ्या कामामुळे माझा या सगळ्याशी थोडा फार संबंध येतो आणि म्हणून मला असलेली माहिती मी इथे देतो इतकंच.  त्यामुळे माझा वर दिलेला सल्ला किंवा माझी माहिती कदाचित चुकीचीही असू शकेल.