भूषणसाहेब, मला तुमची एकूण विचारप्रक्रिया नेहमीच आवडते. इथेही तुम्ही तर्कशुद्ध आणि सुसूत्र सुरुवात केली आहेत. पण, निष्कर्ष काढायला जरा घाई केलीत असं मला वाटतं.
तळ्याला सासरच्या जाचाला कंटाळलेल्या स्त्रीपर्यंत आपण घेऊन आलाच आहात. थोडं आणखी खोलात गेलात तर.. हे साचलेलं तळं म्हणजे माझंच अख्ख अस्तित्व आहे. आणि हा त्याभोवतीचा आपसूकच जमणारा पसारा. ती वाफ म्हणजे मला कधीकधी जाणवणारा या सगळ्या "चित्रा"च्या पलिकडचा मी आणि परत पाऊस म्हणून येणं हा माणसाच्या चिरंतन दौर्बल्यातून निर्माण होणारा अभिजात मोह. मला खरं तर सासरची स्त्री लक्षात आलीच नाही. तुमच्या प्रतिसादात वाचले आणि वाटले.. अरे, खरंच की! अर्थात या कवितेचा मी हा असा अनुभव घेतला. तुम्ही किंवा जयंतरावांनी वेगळा घेतला असेल.
पण म्हणजे "तुम्ही घ्याल तसा अर्थ" ही माझी भूमिका आहे असे समजू नका! कविता ही, objective content आणि सापेक्ष अनुभूतीच्या च्या शक्यतांनी बनलेली असते. अनुभूतीशक्यतांनी कवितेला खोली येते (आणि ती खोली किती अनुभवता येते हे रसिकाच्या रसिकक्षमतेवर अवलंबून असतं) पण objective content शून्य असेल तर मी तरी तिला कविता मानत नाही. या कवितेत, निसर्गाचं निरिक्षण आणि त्यावरचं प्रगल्भ भाष्य हे objective आहे असं माझं मत आहे.