आदरणीय श्री. जोशी,

आपला लेख वाचला पण काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

१. रामाने भरताला राजा होण्याची विनंती केली होती. किंबहुना तशी तयारीदेखिल अयोध्येत सुरू झाली. पण खुद्द भरतानेच रामभेटीला येउन राज्यपद नाकारले व रामाच्या पादुका मागितल्या असे रामायणात वाचल्याचे स्मरते.
२. 'ती' स्त्री शु्र्पणखा आहे असेच माझेही मत आहे.
३. वालीने जरी रामाचा काही अपराध केलेला नसला तरी त्याने सुग्रीवाचा अपराध नक्कीच केला होता(भले तो गैरसमजातून का असेना), आणि जर सुग्रीवाने त्यासाठी अधिक बलशाली रामाची मदत मागितली त्यात काहीही गैर नाही. 'मला काय त्याचे' हा दृष्टिकोन त्याकाळी मित्रांबद्दल वापरत असतील असे वाटत नाही.
४. यज्ञ रक्षक असणे याचा अर्थ दैत्याना देखील अभय देणे असा नक्कीच होत नाही. इंद्रजीत सदर यज्ञ शक्तीप्राप्तीसाठी करत असे व त्यामुळे वानरांचा संहार होत असे. त्यामुळे त्याच्या यज्ञाचा नाश करणे क्रमप्राप्तच होते. आपले सदर मत काहीप्रमाणात सध्याच्या मानवाधिकार आयोगासारखे वाटते.
५. सीतेची अग्निपरीक्षा कदापिही योग्य नाही. त्या गोष्टीचे समर्थन करणे अशक्य आहे. सीतेचा पुन्हा त्याग करताना त्याने केवळ एका राजाचे कर्तव्य पाळले. पतीचे कर्तव्य नक्कीच पाळले नाही.
६. शंबुक पूर्वजन्मी शंबू नावाचा दानव होता. पार्वतीच्या शापामुळे त्याचा शुद्र घरी जन्म झाला व शापमुक्त होण्यासाठी त्याला रामाच्या हातून मरण आले . (पुष्टिमार्ग वैष्णव परंपरेनुसार)

राम हा मनुष्यच होता. तो आदर्श पुरुष नाही असेच माझेही मत आहे. पण आपल्या काही मतांबद्दल थोडे आश्चर्य वाटले. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करावी. माझा इतिहासाचा अभ्यास नाही.