गंधित वारा हा शेर अतिशय सुंदर!

सन्माननीय ऋचा मुळे यांच्या मताविरुद्ध मी हे लिहीत आहे हे आधीच नमूद करतो. ( कवीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे असे त्यांचे मत होते. )

बाकी शेर मला सपाट वाटले. तसेच गझलेमध्ये विविध आशयाचे शेर स्वतंत्ररीत्या एकच रदीफ व कानांना तीच जाणीव देणारे काफिया घेऊन येतात हे जरी खरे असले तरी विषयांचे वैविध्य किंवा संदर्भ किती असावेत याबाबत माझे मत असे आहे की गझल शक्यतो एका स्वभावाची किंवा वृत्तीची वाटावी. त्याने एवढेच होते की रसिकाला मनस्थिती अतिवेगात पालटावी लागत नाही.

उदा:

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता - एक व्यथा

हवे करीअर, हवे प्रमोशन, माडी अन गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता - ही पण व्यथाच, पण सांस्कृतिक बदलांच्या संदर्भातील वाटावी अशी!

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी...?... धूर अन चूल नको आता - ही पण सांस्कृतिक बदलांच्या संदर्भातील वाटावी अशी!

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता - हा शेर वरील शेरांच्या प्रकृतीशी किंवा स्वभावाशी पूर्णपणे विसंगत आहे.

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता) - ग्रेट! प्रत्येक शब्द उंचावरचा! खरे तर या शेराची प्रकृती कशी आहे हे तपासण्याची जरूर सुद्धा वाटत नाही इतका अप्रतिम शेर! मान गये!

सुदैव माझे कुणी पळवले कुणास ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता! - इथे 'भूल' हा शब्द घेता येईल म्हणून हा शेर रचला असावा असे माझे मत आहे. तसेच 'कुणास ना पत्ता' च्या ऐवजी 'मलाच ना पत्ता' असे असायला हवे होते असे वाटले.

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता - पूर्णपणे भिन्न प्रकृतीचा शेर! मिठीत घे अन कुशीत घे असे दोन शब्दप्रयोग केल्यामुळे सहा मात्रा तेच सांगण्यात गेल्या आहेत असे वाटते.

स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ करा. आपल्याला राग आल्यास पुन्हा प्रतिसाद देणार नाही.

धन्यवाद!