नमस्कार
राग वगैरे यायचा प्रश्नच नाही. उलट सकारात्मक चर्चा होणारच असेल, तर आनंदच आहे.
गझलेमध्ये विविध आशयाचे शेर स्वतंत्ररीत्या एकच रदीफ व कानांना तीच जाणीव देणारे काफिया घेऊन येतात हे जरी खरे असले तरी विषयांचे वैविध्य किंवा संदर्भ किती असावेत याबाबत माझे मत असे आहे की गझल शक्यतो एका स्वभावाची किंवा वृत्तीची वाटावी.
येथे आपणच लिहिले आहेत की हे माझे मत (म्हणजे तुमचे स्वतःचे) आहे. माझे मत हेच असेलसे नाही (सध्या तरी अजिबात नाही) आता माझे मत, तुझे मत असे सगळे म्हटले की एकंदर परीक्षण, समीक्षण, टीकाटिप्पणी सगळेच फार सापेक्ष होऊन जाते. आणि अशी सापेक्षता असलेला वाद/चर्चा मग कवीचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य, लिहिण्याचा अनुभव, भावना, विचार, मनः स्थिती, लिहिण्याचे प्रयोजन अशा हजार गोष्टींवर जाऊन पोचतो/ते जेथे व्याक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने मतभिन्नता आढळायला लागते. मराठी संकेतस्थळांवर तर या पातळीवर गेलेल्या चर्चांचे वादातच रुपांतर होते, असा वाईट अनुभव असल्याने या सापेक्षतेशी नि तुमच्या मताशी जोडून आलेल्या गझलेतील शेरांच्या प्रकृतीवैविध्याबद्दलच्या मुद्द्यावर काही एक भाष्य न करता फक्त गझलेबद्दलच - पक्षी शब्दयोजना, लहजा, ओळींचा परस्परसंबंध, सहजता इ. बद्दल बोलतो.
तुमचे प्रत्येक शेराबद्दलचे मत तुमच्या स्वतःच्या गझलेच्या प्रकृतीवैविध्याबाबतच्या विश्वासावर आधारीत आहे, आणि त्याच एका मुख्य कसोटीवर तुम्ही शेरांचा विचार केला आहे, हे तुमच्या वरील प्रतिसादातील प्रत्येक वाक्यातून दिसूनच येत आहे.
तुम्ही मांडलेला एकच मुद्दा मला व्यक्तिशः खोडून काढावासा वाटतो; तो म्हणजे 'भूल' शब्द बसविण्यासाठी रचलेल्या शेराचा, किंवा भरतीच्या शेराचा. एकंदर काफीया संच पाहता 'भूल' असलेला शेर अंतर्भूत होणे स्वाभाविकच ठरते. मात्र मात्रा, शब्द यांची फारशी ओढाताण न करता; सहजपणाला नि सुस्पष्टतेला धक्का न लावता काफिया योजणे सहज जमले तर शेर भरतीचा ठरायचा नाही, असे मला वाटते. 'भूल'च्या बाबतीत मला असे काही झाल्याचे जाणवत नाही - लिहितानाही आणि वाचतानाही. 'भूल'च्या बाबतीत 'कुणास ना पत्ता' च्या ऐवजी 'मलाच न पत्ता' हा बदल मात्र 'भूल' ही कल्पना ठसविण्यासाठी निश्चितच जास्त प्रभावी आहे, हे मला पटले. ते तुम्हाला सुचले नि मला नाही याबद्दल तुमहा किंचितसा हेवाही वाटला लिखित प्रतीत हा बदल करून घेतला आहे. शक्य असल्यास प्रशासकांनी येथेही तो बदल करावा, ही नम्र विनंती.
गंधित वाऱ्यांचा शेर तुम्ही अप्रतिम म्हणता; प्रत्येक शब्द, ओळ उच्च आहे म्हणता; पण मला स्वतःला तर 'पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आहे' ही ओळ सर्वाधिक सहज वाटली, त्या ओळीतली गुर्मी सगळ्यात जास्त भावली नि अर्थातच तो शेर सगळ्यात जास्त वजनी वाटला. हे वाचकांवरच सगळ्यात जास्त अवलंबून असते, असे मला वाटते. कवीला स्वतःला जे आवडते/आवडत नाही तेच वाचकांना आवडेल/आवडणार नाही, असे गृहीतक का बरे? त्यामुळे तुम्हाला जे भावले त्याचा पूर्ण आदर करूनच कोणती ओळ उच्च, कोणती शब्दयोजना उच्च हे ठरवण्यापेक्षा; त्यांचे निकष काय, कसे, कोणते हे ठरवण्यापेक्षा काय केल्याने ओळ नि त्यायोगे शेर अधिक प्रभावी होईल, मनात रुंजी घालत राहील, हे पाहणे महत्त्वाचे. या संकेतस्थळावरील माझ्या कित्येक जुन्या गझलकार मित्रांचे अनेक शेर, काहींच्या ठराविक ओळी आजही मुखोद्गत आहेत. याचे कारण त्या मला आवडल्या. माझ्या कुवतीने मी त्यांचा सौंदर्यास्वाद घेतला. त्यांना स्वतःला कदाचित त्या आवडत नसतीलही.
त्यामुळे एखाद्या गझलेबाबतची चर्चा स्वतःमधला वाचक बाजूला ठेवून करायची असेल, तर ती गझलेबद्दलच - पक्षी शब्दयोजना, लहजा, ओळींचा परस्परसंबंध, सहजता इ. बद्दल - असेल; पर्यायी शब्दयोजनेमुळे शेराच्या व गझलेच्या सौंदर्यवर्धनाबद्दल असेल, ओळींचा परस्परसंबंध अधिक घट्ट नि त्यायोगे शेर सुस्पष्ट होण्याबाबत असेल, तरच तिला अर्थ आहे. या निकषांचा माझ्या या गझलेपुरता विचार केल्यास, गझलेचा रचनाकर्ता म्हणून शेवटचा शेर संदिग्ध झालाय; मी स्वतः नमूद केलेल्या या निकषांवर कमी पडतोय नि सुधारणेस खूप वाव आहे, असे मला वाटते.
स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ करा. आपल्याला राग आल्यास पुन्हा प्रतिसाद देणार नाही.
धन्यवाद!