दिवस साजरे करणे ह्याला माझा विरोध असला तरी ते माझे व्यक्तिगत मत आहे. म्हणून सर्वांनी विरोधच करावा असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. जसे दिवस साजरे करण्याला लाखोंचा पाठिंबा आहे तसा न करण्यालाही असेलच की. तुम्हाला जसे हे मान्य तसे मला हे अमान्य. ह्या पलीकडे काही नाही. असो.
माझा मुद्दा एव्हढाच की स्त्रियांना आणि स्त्रियांनाच भोगावे लागते अशी परिस्थिती आता अजिबात राहिलेली नाही. मनीषा यांच्या लेखात ह्या अनुषंगाने नकारात्मक सूर जास्त लागला असे वाटले म्हणून हा प्रतिसाद प्रपंच. माझ्या प्रतिसादांतला मला म्हणायचा मुद्दा पुनः इथे देतो,
हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरांमध्ये पूर्णपणे बदल घडून यायला वेळ लागणारच. तेव्हढा तो दिला गेलाच पाहिजे. उगाचच स्त्री मुक्तीचे गोडवे गात बसण्यापेक्षा आणि स्वतःला वेगळे काढण्यापेक्षा बदलाची प्रक्रिया लवकर घडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. परिस्थितीत बदल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत. रडत बसून काही उपयोग नाही.
मुळात ध्येयाचा मार्ग कुणासाठीही खडतरच असतो.
मेधा पाटकर, लता मंगेशकर इ. व्यक्ती मोठ्या होतात तर आम्ही तुम्ही का नाही? त्यांना ईश्वरी देणगी वगैरे आहे असे आपण मानू. मग आपल्याकडे ईश्वराने पाठ फिरवली आहे काय?
ऋचाने म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या अनेक अनिष्ट चालिरितींविरोधात आवाज उठवले गेले, त्यांच्यासाठी ध्येयाचा मार्ग खडतर नव्हता? ते लोक आपल्यासारखे रडत बसले? माझा अमुक अपमान झाला, माझा तमुक अपमान झाला म्हणून? काहीही झालं तरी ध्येयाप्रत लढत राहिलेच ना?
संघर्ष अपरिहार्य आहे! मग तो कुणीही असो. ह्या जगात कष्टाशिवाय कुणालाही काहीही मिळणार नाही. त्यातून एखाद्याची मानसिकता बदलून क्रांती वगैरे घडवायची असेल तर संघर्ष, कष्ट अपरिहार्यच. हां! त्याच्या तीव्रतेत फरक असू शकेल. पण म्हणून तो कुणा एका घटकासाठी जास्त किंवा कमी अशी तुलना नक्कीच करता येणार नाही.
दुसरे,
आपला मातृदिनाचा संदर्भ चुकला आहे असे वाटते. पिठोरी अमावास्येला साजरा होणारा सण 'मातृ दिन' नसून मातृका पूजनाचा आहे. पुराणात वर्णन केलेल्या सप्तमातृकांचे पूजन ह्या दिवशी केले जाते. ह्याबाबतची अधिक माहिती मी मिळवतच आहे. मिळाली की ती पण देईन.
अजून एक,
बैलपोळा आणि पुरुष दिन एकाच दिवशी आले तरी लाड मात्र बैलांचेच (बैलोबांचे नाहीत.)