तुमचे प्रत्येक शेराबद्दलचे मत तुमच्या स्वतःच्या गझलेच्या प्रकृतीवैविध्याबाबतच्या विश्वासावर आधारीत आहे, आणि त्याच एका मुख्य कसोटीवर तुम्ही शेरांचा विचार केला आहे, हे तुमच्या वरील प्रतिसादातील प्रत्येक वाक्यातून दिसूनच येत आहे.

शक्य आहे की असे आपल्याला वाटणारच! पण माझ्यामते 'गझल' या काव्यप्रकाराकडून ज्या साधारणपणे सर्वमान्य अपेक्षा असतात ( ज्या मला ज्ञात आहेत असे मला वाटते ) त्यांच्या निकषांवर आधारित माझे भाष्य आहे. अर्थात, ते निकष असावेत की नाहीत हे सापेक्ष आहे असे कुणीही म्हणू शकते. सर्वात खाली मी गझलेकडून असलेल्या ( मला ज्ञात असलेल्या ) अपेक्षा लिहिल्या आहेत, त्या आपल्या अयोग्य वाटल्यास कळवावेत.

तुम्ही मांडलेला एकच मुद्दा मला व्यक्तिशः खोडून काढावासा वाटतो; तो म्हणजे 'भूल' शब्द बसविण्यासाठी रचलेल्या शेराचा, किंवा भरतीच्या शेराचा. एकंदर काफीया संच पाहता 'भूल' असलेला शेर अंतर्भूत  होणे स्वाभाविकच ठरते. मात्र मात्रा, शब्द यांची फारशी ओढाताण न करता; सहजपणाला नि सुस्पष्टतेला धक्का न लावता काफिया योजणे सहज जमले तर शेर भरतीचा ठरायचा नाही, असे मला वाटते.

इथे मीही असे म्हणू शकतो की आपले मत सापेक्ष आहे, पण तसे म्हणणार नाही.

आपला शेर पहा:

सुदैव माझे कुणी पळवले कुणास ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

या शेरात आपल्या दृष्टीने 'भूल' हा काफिया 'काफिया संचात बसतो' म्हणून येणे स्वाभाविक आहे. मी आपल्या शेराच्या सहजतेबद्दल काहीच म्हणालो नाही. पण आपल्या या शेरात (बहुधा) आपल्याला हे म्हणायचे आहे की आजपर्यंत मला फसवून माझे सारे लुटलेत, आता उरलेलेही लुटायचे असल्यास लुटा, मला भूल देऊ नका, मला ते माहीतच आहे की तुम्ही लुटणार आहात. किंवा 'भूल' होऊ देऊ नका म्हणजे चूक होऊ देऊ नका. आता या शेराचा ( गझलेचा एक निकष ... ) 'सच्चेपणा' कृपया स्पष्ट करावात. म्हणजे मृत्यूला उद्देशून आपण शेर रचला आहेत हे समजू शकते. तशी मनस्थिती एखाद्याची होऊ शकते. ओव्हन, करीअर हे ही समजू शकते. पण आपले असे काय लुटले गेले ( जरा वैयक्तिक वाटेल पण सकारात्मक चर्चेसाठी आवश्यक आहे ) की ज्यामुळे आपण हा शेर रचलात? आपण आत्ता ज्या परिस्थितीत आहात त्यापेक्षा नक्की कशी चांगली परिस्थिती आधी होती? सुदैव या शब्दामध्ये 'श्रीमंती', 'भरपूर प्रेमाची माणसे', 'प्रकृती', अशा अनेक गोष्टी किंवा त्यातील एखादी किंवा काही येतात. जरा मुद्याच्या पुष्ट्यर्थ वरवर असंबद्ध वाटेल असा एक विषय मांडतो.

जरा एखाद्या माणसाची एक किडनी फसवून काढून डॉक्टरांनी विकली अन त्याला ते समजले तर त्याचा हा शेर असेल तर समजता येते. किंवा बहादूरशहा जफरला परकीय राजवटीच्या आत्यंतिक छळामुले इतके नैराश्य आले होते की त्याने असे अनेक शेर रचले आहेत. शेरामध्ये कुठेतरी वैयक्तिक अनुभुती जाणवणे अत्यंत आवश्यक आहे. ती मला आपल्या या शेरात जाणवली नाही.

त्यात आपणच म्हंटले आहेत की 'भूल' हा काफिया येणे 'स्वाभाविक' आहे. त्यामुळे एका प्रकारे आपण माझ्याच मुद्याचे समर्थन करत आहात असे मला वाटते.

 मला स्वतःला तर 'पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आहे' ही ओळ सर्वाधिक सहज वाटली, त्या ओळीतली गुर्मी सगळ्यात जास्त भावली नि अर्थातच तो शेर सगळ्यात जास्त वजनी वाटला.

अर्थातच शेर चांगला आहे. मी इतकेच म्हणालो की इतर भावनांशी मेळ खाणारा वाटत नाही. तसेच, एखाद्या शेरात 'गुर्मी' वाटणे हा शेर चांगला असण्याचा निकष नाही.

हे वाचकांवरच सगळ्यात जास्त अवलंबून असते, असे मला वाटते. कवीला स्वतःला जे आवडते/आवडत नाही तेच वाचकांना आवडेल/आवडणार नाही, असे गृहीतक का बरे? त्यामुळे तुम्हाला जे भावले त्याचा पूर्ण आदर करूनच कोणती ओळ उच्च, कोणती शब्दयोजना उच्च हे ठरवण्यापेक्षा; त्यांचे निकष काय, कसे, कोणते हे ठरवण्यापेक्षा काय केल्याने ओळ नि त्यायोगे शेर अधिक प्रभावी होईल, मनात रुंजी घालत राहील, हे पाहणे महत्त्वाचे.  

काय केल्याने ओळ अधिक प्रभावी होईल हे पाहणे महत्त्वाचे - असे जर आपले म्हणणे असेल तरः

ओव्हन, करीअर हे शब्द शक्य असल्यास रिप्लेस करावेत. कारण त्या इंग्लिश शब्दांमुळे मराठी गझलेचा मूड नष्ट होतो. 'भूल' या शेरात जास्त 'पर्टिक्युलर' विषय, खरे तर स्वतःचा अनुभव आणावा. 'विठ्ठल' या शेरामधे 'विठ्ठलाचा' काहीही संबंध नाही असे माझे मत आहे. त्याऐवजी शंकर, ईश्वर असे काहीही चालले असते. गझलेमध्ये सहसा 'सहज बदलता येतील' असे शब्द घेऊ नयेत. ( पण तो तंत्राचा भाग झाला )

त्यामुळे एखाद्या गझलेबाबतची चर्चा स्वतःमधला वाचक बाजूला ठेवून करायची असेल, तर ती गझलेबद्दलच - पक्षी शब्दयोजना, लहजा, ओळींचा परस्परसंबंध, सहजता इ. बद्दल - असेल; पर्यायी शब्दयोजनेमुळे शेराच्या व गझलेच्या सौंदर्यवर्धनाबद्दल असेल, ओळींचा परस्परसंबंध अधिक घट्ट नि त्यायोगे शेर सुस्पष्ट होण्याबाबत असेल, तरच तिला अर्थ आहे. या निकषांचा माझ्या या गझलेपुरता विचार केल्यास, गझलेचा रचनाकर्ता म्हणून शेवटचा शेर संदिग्ध झालाय; मी स्वतः नमूद केलेल्या या निकषांवर कमी पडतोय नि सुधारणेस खूप वाव आहे, असे मला वाटते.

मला आपले खुलेपणा आवडला. खरे तर मलाच आपला हेवा वाटत आहे. इतका सच्चा मलाही व्हायचे आहेच. आपण दिलदारपणे प्रतिसाद घेतलात ते आवडले. ( मीही घेतो, पण मुळात प्रतिसाद येतात याचाच इतका आनंद होतो की बास.. हा हा हा )

स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ करा. आपल्याला राग आल्यास पुन्हा प्रतिसाद देणार नाही.

अजिबातच राग आलेला नाही. उलट बरे वाटले. कुपया चर्चा चालू ठेवा. मलाही बरेच नवीन समजले. जसे आपण 'लहजा' 'सहजता' यांचे पूर्ण भान ठेवून शेर रचता असे! ( खरच बोलतोय, उपरोधिक समजू नयेत. )

गझलेचे निकष

( तंत्राबद्दल कुठलाही निकष लिहीत नाही, कारण ते नॉन निगोशिएबल आहे )

१. गझल ही खासगी स्वरुपाची असावी. म्हणजे संस्कृती, आई, वडील, मुलगा, बहीण, सासू , संत, स्वातंत्र्यवीर, निसर्ग हे विषय शक्यतो टाळावेत, घ्यायचेच असल्यास 'आपल्या' अनुभवांमध्ये ते कसे बसतात ते पाहून घ्यावेत. अनुभव कथन असावे.

२. गझल ही स्वतःला जग कसे दिसले अन जग आपल्याशी कसे वागले, आपल्या काय काय अनुभव आले या विषयाशी निगडीत असते. हजारो उर्दू गझला याचे प्रमाण आहेत. इतर विषयांसाठी कसीदा, पोवाडे, अभंग, भावगीते, लावण्या वगैरे आहेतच!

३. गझलेमध्ये नाट्यमयता, मातृभूमी व आपल्या संस्कृतीची जाणीव होणारी शब्दरचना, विरोधाभास, उपमा, नाजूक शब्दांची निवड यावर भर द्यावा.

४. गझलेमध्ये बरेचदा 'व्यथा' ही मूलभूत मानावी.

५. गझलेमध्ये 'प्रेम' किंवा त्या संबंधातील अनुभवांचे 'अ-सवंग- असे वर्णन, शक्यतो प्रेमाची 'असफलता' असणे गझलेला खुलवते. प्रेम सफल झाले की गझलेत घेताच येत नाही असे म्हणायचे नाही. पण असफलता खुलवते.

६. गझलेमध्ये संवादरुपी विधाने असावीत.

७. गझलेमधील प्रत्येक शेर स्वतंत्रपणे एक काव्य असतो हे जरी सर्वमान्य असले तरी विषयाचा एक स्वभाव असतो. जसा माणसांचा स्वभाव असतो तसा. साधारण एकाच स्वभावाची माणसे एकमेकांशी मैत्री करताना सहजपणे करू शकतात तसे खूप भिन्न स्वभावाची माणसे करू शकत नाहीत. वेळ पाळणाऱ्यांची वेळेच्या बाबतीत निष्काळजी लोकांशी मैत्री होणे कठीण असते. तसेच शेरांचेही होते.  एकाच गझलेत प्रेम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निवडणुका, माणसे सापापेक्षा विषारी असण्याचा उल्लेख, पाशिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण वगैरे घेणे चांगले वाटत नाही.

आपली ही गझल वरील निकष क्रमांक ४ व ६ यांची पूर्तता करते.

आपल्या प्रतिसादाचा अभिलाशी.