गझलेमध्ये विविध आशयाचे शेर स्वतंत्ररीत्या एकच रदीफ व कानांना तीच जाणीव देणारे काफ़िया घेऊन येतात हे जरी खरे असले तरी विषयांचे वैविध्य किंवा संदर्भ किती असावेत याबाबत माझे मत असे आहे की गझल शक्यतो एका स्वभावाची किंवा वृत्तीची वाटावी. त्याने एवढेच होते की रसिकाला मनस्थिती अतिवेगात पालटावी लागत नाही.

हे तुमचे मत जर मान्य केले तर गझल ह्या काव्यप्रकाराच्या इमारतीखाली सुरुंग लावून तिला तिच्या पायासकट उखडून टाकावी लागेल.प्रत्येक शेर स्वतंत्र असणे व त्यात वेगवेगळे विषय व भावना अभिव्यक्त करण्याची मुभा असणे ह्यात गझलेचा आत्मा आहे, तिचे वैशिष्ट्य आहे, तिचे वेगळेपण आहे. केवळ छंद, रदीफ व काफ़ियाच्या आराखड्यात बसते ती गझल नव्हे. तसे असते तर एकाऐवजी दोन यमके वापरली (रदीफ व काफ़िया) हाच काय तो गझलेत व इतर छंदबद्ध कवितांमध्ये फरक उरतो. हे पटण्यासारखे नाही. विषयांचे वैविध्य हे गझलेचे वैशिष्ट्य जाणून व स्वीकारूनच रसिकाने गझल वाचावी. मनस्थिती पालटायची तयारी नसल्यास कविता (नज्म) विपुल संख्येने उपलब्ध आहेतच की. सफरचंदाचा आस्वाद सफरचंद म्हणूनच घ्यायचा असतो. ते आंब्यासारखे लागत नाही म्हणून तक्रार करण्यात काय हशील. अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आवड-निवड वैयक्तिक असू शकते मात्र गझलेचे परीक्षण व समीक्षा गझलेच्या सर्वमान्य नियमांनुसार व निकषांनुसार व्हावे.