प्रिय भूषण,

प्रतिसादाबद्दल आभार.

मला आपल्या प्रतिसादाच्या शेवटी असलेले जवळपास सगळेच निकष मान्य नाहीत. हे निकष आपण कोणत्या गोष्टींचा विचार करून मांडत आहात, यात प्रमाण व तंत्राचा, संकेतांचा भाग किती, तुमच्या स्वतःच्या स्वतंत्र विचारांचा भाग किती इ. इ. अनेक प्रश्न पडतात. पण ते असो. ७ व्या मुद्द्यातील युक्तिवाद मुद्दा पटवून देण्याच्या दृष्टीने पुरेसा वाटत असला तरी सापेक्षतेच्या चौकटींमध्ये अडकायची वेळ येईल त्यावेळी खोडला जाण्याची शक्यता जास्त. तुम्ही जे निकष मांडलेत त्या बाबतीत मला कधी फार कष्ट पडले नसल्याने / अडथळे जानवले नसल्याने त्यांचा विचार करायची गरज पडली नसेल, असे म्हणू हवे तर. त्यामुळे ते बाजूलाच ठेवतो. तेच इष्ट वाटते.

'भूल'चा तुम्हाला लागलेला पहिला अर्थ बरोबर आहे (भूल घालून फसवणे, लुटणे, चोरणे या अर्थी). भूल म्हणजे मराठीत चूक असे मला वाटत नाही; सबब, दुसरा अर्थ खारीज! पण तुम्हाला अर्थ लागला असे मानले तर तुम्ही काय चोरले गेले, किती किमती होते वगैरे जे तपशील विचारले आहेत, किंवा जे मी शेरात मांडायला हवे होते असे म्हटले आहेत,हे फारच हास्यास्पद वाटले. 'सुदैव' चोरले गेले असे ओळीत स्पष्ट म्हटले आहे.सुदैव हीच इतकी किमती गोष्ट आहे की सुदैवात काय काय समाविष्ट होते वगैरे बाळबोध, निरर्थक आणि माझ्या मते अनावश्यकच आहे. त्यामुळे तुम्हाला अर्थ लागला असूनही तुम्ही असे प्रश्न विचारलेत याचे सखेद आश्चर्य वाटते. वाचकाने जे अनुभवले असेल ते सुदैव शेरातील सुदैवाच्या जागी ठेवले तरी अनुभूतीच्या, शेरातील मजेच्या, भावना पोचण्याच्या दृष्टीने काही बाधा येते, असे मला वाटत नाही.

इंग्रजी शब्द टाळणे मी कटाक्षाने पाळतच असतो. १०० पैकी ९९ वेळा (आपणास नम्र विनंती की माझ्या याआधीच्या प्रकाशित गझला वाचून किती गझलांमध्ये इंग्रजी शब्द वापरले आहेत, हे पाहावे) माझे स्वतःचे मतही हेच की शक्यतो असे शब्द टाळले जावेत - असे = बिगर मराठी - इंग्रजीच्या जोडीला अगदी उर्दू, हिंदी सुद्धा. पण करीअर, ओव्हन, फोन अशा साध्यासोप्या शब्दांतील सहजभाव, दैनंदिन जीवनातील त्यांची ओळख, सामान्यजनांना त्यांच्याबद्दल वाटणारा आपलेपणा आणि नाविन्य (किंवा फार फार तर आधुनिकता म्हणू) गझलेतील भावना, अर्थ, कल्पना पोचण्यासाठी पूरक ठरत असतील, तर असे शब्द वापरण्यास मी कचरत नाही / कचरणारही नाही. काळनुरूप होणारे जीवनमान, संस्कृती, बोली, रूपके, संकेत यांच्यातील बदल सामावून घेणे हे मराठी गझलेचे वैशिष्ट्यच आहे. आणि तेही विचार व भाषा भ्रष्ट न होऊ देता! तेव्हा अशा शब्दांनी मूड-बिड नष्ट होतो असे काही नाही. हा सगळा मी खुळेपणा मानतो. उदा. रूपेश देशमुखांची 'एक फोन कर' ही गझल सुरेशभट डॉट इन् वर वाचावी.

'गुर्मी' मी माझ्या स्वतः बद्दल नाही किंवा रचनाकर्ता म्हणून नाही; तर एक भाव, ओळीतून प्रतीत होणारा संवादकाचा ऍटिट्यूड् म्हणून बोललो होतो. प्रत्येक ओळीतून/शेरातून वेगवेगळे भाव प्रकट होत असतात - गुर्मी, करुणा, खेद इ. - तसाच, त्यातलाच तो एक. बाकी काही नाही. त्यामुळे त्याबद्दलचा तुमचा गैरसमज दूर झाला असेल, अशी आशा करतो. शेरातून गुर्मी दर्शविली जाणे म्हणजे शेर चांगला नाही, त्याच्या चांगलेपणाचा तो निकष नाही वगैरे सगळा पोकळपणा आहे. असो.

चार प्रतिसदांच्या निमित्ताने झालेली एकंदर चर्चा पाहता, यापुढे माझ्याच्याने जाहीर मंचावर ही चर्चा पुढे जाऊ शकेल असे मला वाटत नाही. त्यामुळे हाच शेवटचा प्रतिसाद मानून आवरते घेतो. यापुढील साधकबाधक चर्चा/वाद इ. खाजगीतून झाल्यास सोईस्कर होईलसे वाटते.

प्रतिसादांच्या निमित्ताने येथवर झालेल्या वैचारीक देवानघेवाणीबद्दल अनेक धन्यवाद!