आजच्या ठळक बातम्या -
प्रत्येक शब्द माझा जळती मशाल आहे
प्रत्येक अक्षराचा हेतू कराल आहे
तलवार चालवावी दुसऱ्या कुणीही येथे
माझी सदाचसाठी हातात ढाल आहे
भक्ती स्वतःच करता मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता तुमची कमाल आहे
जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
'परवा' असे 'उद्या' जो, तो आज 'काल' आहे
मदिरा खराब आहे जो सांगण्यास आला
तोही पिऊन गेला सगळी धमाल आहे
'जाणे तिचे नि येणे' सारे थिजून पाही
दुर्मीळ फार हल्ली 'कातील चाल आहे'
भेटो कितीक येथे पण गीतकार माना
त्यालाच सत्य ज्याच्या श्वासात ताल आहे
हिरवा गुलाल येथे दंग्यास मूळ होतो
पण रंग दोन्हिकडच्या रक्तास लाल आहे
आजार हा कवींचा, सवलत हजार टक्के
करणार काय सांगा? बकवास माल आहे
- भूषण कटककर
(सुरेशभट डॉट इन् वरून साभार)