माफ करा, माझ्या काव्यविषयक जाणिवा तितक्या प्रगल्भ नसल्यामुळे असेल कदाचित पण मीर ह्यांच्या ह्या गझलेतील शेरांचे तुम्ही लावलेले अर्थ आजवर माझ्या लक्षातच आले नव्हते.


हस्ती अपनी हुबाबकीसी है
ये नुमाईश सराबकीसी है - निराशा

आपलं आयुष्य बुडबुड्यासारखे क्षणभंगुर आहे, पण त्याचे दर्शन मद्यासारखं मादक आहे. ह्यात मलातरी निराशा दिसत नाही, किंबहुना आयुष्याविषयी आसक्तीच दिसते.

नाजुकी उसके लबकी क्या कहिये
पंखडी इक गुलाबकीसी है - असफल प्रेमातील प्रेयसीची आठवण झाल्यावर येणारी निराशा

तिच्या ओठांचा नाजुकपणाबद्दल काय सांगू, एखाद्या गुलाबाच्या पाकळीसारखे आहेत. प्रेयसीच्या ओठांच्या ह्या वर्णनात मला ना प्रेमाची असफलता दिसते ना निराशा. दिसतो तो शायर आपल्या मित्रांना आपल्या प्रेयसीच्या रूपाचे वर्णन करताना.

बार बार उसके दरपे जाता हू
हालत अब इज्तिराबकीसी है - प्रेयसी किंवा ईश्वराच्या प्राप्तीमध्ये आलेली निराशा

पुन्हा पुन्हा मी प्रेयसीच्या, परमेश्वराच्या दाराशी जातो... अस्वस्थ आहे मी. इथेही नैराश्यापेक्षा प्रेयसी/परमेश्वरप्राप्तीची ओढ व अस्वस्थता दिसते. पण निदान इथे नैराश्याच्या कुठेतरी जवळपास तरी आपण पोचतो.

मै जो बोला कहाकी ये आवाज
उसी खानाखराबकीसी है - निराशा

मी काही बोलताच ती म्हणाली, हा आवाज त्या घरदार उद्ध्वस्त झालेल्या माणसासारखा वाटतो आहे. ह्यात तिच्या बोलण्यात तुच्छता आहे असे समजून कवी दुःखी, निराश झाला हे मी समजू शकतो.

मीर उन नीमबाज आखोमे
सारी मस्ती शराबकीसी है - असफल प्रेमातील प्रेयसीची आठवण झाल्यावर येणारी निराशा

मीर, त्या अर्धोन्मीलित डोळ्यांमध्ये मद्याची सारी धुंदी आहे. प्रेयसीच्या मादक नयनांच्या वर्णनात मला तरी असफल प्रेम, निराशा असे काहीही दिसून येत नाही.

मुळात निराशा हे इथे खानदान आहे.

तेव्हा, पुन्हा एकदा क्षमस्व, परंतु मीर ह्यांच्या ह्या सुंदर गझलेत मला निराशेचं खानदान काही सापडत नाही. तेव्हा ह्याविषयी आपण असहमत असण्याबद्दल सहमत होऊया (लेट अस ऍग्री टु डिसॅग्री).