सुदैव माझे कुणी पळवले कुणास ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मूळ चर्चा सुरू झाली ती या शेरामुळे! माझ्यामते हा शेर 'भूल' हा काफिया घेता यावा म्हणून रचलेला आहे. त्यातही 'हिंदी' अर्थाने भूल 'मराठीमधे'  वापरलेले नाही. मराठी भूलचा अर्थ होतो ऍनेस्थेशिआसारखे काहीतरी.

आता, सुदैव पळवतात म्हणजे काय तो एक वेगळा भाग मानुयात. पण ते सुदैव कुणी पळवले याचा पत्ताच नाही. बर, तो पत्ता स्वतःलाच नाही असे नाही तर तो कुणालाच नाही. म्हणजे कदाचित पळवणाऱ्यांनाही माहीत नाही की त्यांनी सुदैव पळवले. एकदा सुदैव गेल्यावर कवीकडे उरणार काय? पण ते जे काय उरले आहे तेही समजा लुटायचे असेल तर कवी परवानगी देत आहे. लुटा! काय हवे ते लुटा! फक्त मला भूल देऊ नका. आता यात 'भूल'चा संबंध काय हेच मला समजत नाहीये. लोक कवीला भूल देऊन सुदैव पळवतात म्हणजे काय?

कुणीतरी कृपया प्रकाश पाडावा की इथे 'भूल' देण्याचा संबंध काय? मी ताणायचे म्हणून ताणत नसून कवीने त्या गोष्टीचे 'मला' न पटणारे समर्थन करून दाखवले आहे म्हणून जिज्ञासेतून विचारत आहे. कशीही झाली तरी ही चर्चाच आहे.

( मी माझ्या पद्धतीने या आशयावर एक शेर रचला ते कवीने तसा रचला म्हणून. मी स्वतः अशा आशयामध्ये भूल वगैरे वापरले नसते. )