श्री चैतन्य साहेब,
आपण प्रश्न विचारलेत यात काहीच वावगे नाही. आपल्याला काही ओळी आवडल्या याचा आनंद झाला. काही ओळी संदिग्ध वाटल्या, हे माझे अपयश आहे. व्यवस्थित आस्वाद घेता येईल अशा ओळी न रचू शकल्याबद्दल माफ करावेत.
ओळींचा आशय लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
लाचारपणाचा कणा वाकता आहे
मी पराजयाचा 'पाय काढता' आहे
वेळ आली की मी माझा सर्व अभिमान वगैरे गुंडाळून ठेवून आपला स्वार्थ पूर्ण करण्याचे पाहतो. त्यात लाचार व्हावे लागले तरी होतो. पण हे कधीतरीच झाले तर ठीक, कायमच होते. कायमच मी पराजितासारखा असतो. पराजित माणसे अपमानित होऊन काढता पाय घेतात. हा जो 'काढता पाय' आहे तेच माझे 'नाव' वाटावे इतका मी पराजित आहे. ( फारच द्राविडी प्राणायम वाटत असावा - हे मला नीट मांडता आले नाही यासाठी क्षमस्व)
मृत्यूच्या पेढीवर बिचकत जाणारा
मी सजीवतेचा 'हात मारता' आहे
हे जीवन संपणार आहे. ते किती लांबणार आहे हे मृत्यू ठरवतो. तो देईल तितके जीवन! मला जिवंत रहायचे आहे म्हणून माझी सजीवता बिचकत बिचकत जाऊन मृत्यूच्या नकळत थोडा काळ वाढवून येते. ही चोरी झाली. हात मारणे झाले. तो 'मारणारा हात' मी आहे. ( हाही द्राविडी प्राणायाम वाटावा. )
हा पूल करावा पार, मला भेटावे
पण मोहनदीचा जोर वाढता आहे
(मूळ शेरात मी 'हा' या शब्दाऐवजी 'मी' हा शब्द रचला होता. ) मी मला भेटू शकावे याचा प्रयत्न करत आहे. मध्ये पूलही आहे. पण मोहनदीचा जोर इतका वाढला आहे की एका बाजूच्या अतिशय बिघडलेल्या मला दुसऱ्या बाजूच्या 'फार पुर्वी शुद्ध असलेल्या' मला भेटणे अशक्य होत आहे. कारण त्या नदीतच मी वाहून जात आहे. ( हा ऐवजी मी घेतला असता तर कदाचित हा प्रश्न पडला नसता. पण मला वाटले की इथे जर 'तळे' म्हणजे 'मी' आहे हे लोक समजू शकत असतील, तर 'एकदाच' मी म्हणणे म्हणजे दोन 'मी' असतील असेही लोक समजून घेतील.) अर्थात, माझे हे विधान आपल्याला उद्देशून नाही याची खात्री बाळगावीत.
अवांतर - मी कविता एक एक महिना थांबून करत नाही. साधारण २ तासात रचतो. त्यामुळे त्यात बरेच दोष येत असावेत. ( आपण दोष आहेत असे म्हंटलेले आहेत असे मी म्हणत नाही. ) माझ्यावर हा आरोप बरेचदा झाला आहे की मी 'पाट्या टाकतो'. तेव्हा मला कुणाचीही मते लागत नाहीत. तेव्हा आपण हवे तितके प्रश्न विचारत जावेत, मला आनंदच होईल.
धन्यवाद!