यातील बरेच शब्द एरवीही वापरात आहेत. उदाहरणार्थ -
अभिलेख - रेकॉर्ड या अर्थीच सरकारी स्तरावर तर रीतसर वापरला जातोच, शिवाय बाहेरही वापरला जातो.
संविधानसभा - हाच शब्द आहे. घटनासभा असेही म्हटले जाते, पण फारच क्वचित; पण ते फारसे उचित नाही.
प्रतिभूती - भारत प्रतिभूती मुद्रणालय, नोटा-मुद्रांक वगैरेंची छपाई करणारे एक मुद्रणालय नाशकात आहे. जामीन या अर्थी मात्र प्रतिभूती हा शब्द फारसा वापरात नाही.
नस्ती/नस्त्या - केवळ सरकारी स्तरावर शिल्लक असलेला शब्द.
परमार्शदात्री समिती - बहुदा आता हा शब्दही शिल्लक नाही. त्याऐवजी सल्लागार मंडळ हा सर्रास वापरला जाणारा शब्द.
दूरमुद्रक - प्रिंटर नव्हे, टेलेप्रिंटर. त्या अर्थी हा शब्द वापरला जात असे. आता टेलेप्रिंटरच नाही. दूरमुद्रक कुठून शिल्लक रहायचा?
महाशासक - अगदी विरळा शब्द. आता फारसा दिसत नाही.
चक्रीटंकित - हा शब्द मला तरी सायक्लोस्टाईल या अर्थी वाटत नाही. त्यासाठी वर महेश यांनी म्हटल्याप्रमाणे चक्रमुद्रित असाच शब्द आहे.
न्यूनीकरण - हा शब्द मला फक्त संदर्भांकीत पुस्तकातच वाचावयास मिळाला होता. एरवी कम्युटेशनला सरळ शिक्षेत कपात असेच म्हटले जाते.
उत्तरीय परीक्षा - परीक्षा हा शब्द फारसा नाही. उत्तरीय तपासणी असा आजही वापरला जातो.
संपुष्टी - हा शब्द मला फक्त संदर्भांकीत पुस्तकातच वाचावयास मिळाला होता. एरवी कोलॅबरेशनला सहकार्य किंवा तत्सम शब्दच वापरला जातो.
न्यास - डेटा या अर्थी न्यास हे मला या पुस्तकातूनच दिसले आहे. एरवी न्यास म्हणजे ट्रस्ट (चॅरिटी ट्रस्ट, संस्था, विश्वस्त संस्था या अर्थी) यासाठीच वापरला जातो.
उन्मुक्त - आरोपातून डिसचार्ज याअर्थी सुटका, मुक्त करणे असे प्रचलीत आहे. उन्मुक्त नाही. भार याअर्थी डिसचार्ज साठी भारमुक्त असेही म्हटले जाते.
दयार्द्रता - अगदी विरळा वापर. एरवी क्लेमन्सीला सर्रास माफी.
काटपुरावा - सुरेख शब्द, सोपाही. पण वापर क्वचित. अॅलिबीला एरवी माझ्या माहितीप्रमाणे सबब असाही शब्द वापरतात.
फितलेला साक्षीदार - अगदी क्वचित वापर. बहुतांशी फुटलेला साक्षीदारच.
वचनपत्र - सरकारी, पतपेढ्यांमध्ये वगैरे वापर दिसतो.
स्वीकारोक्ती - कबुलीजबाब हा सर्रास वापरातील शब्द.
अभियोग - क्वचित वापर.
उद्योगालय - वर्कशॉप या अर्थी कार्यशाळा, कर्मशाळा. हाच शब्द वर्कशॉप या नावाने होणाऱ्या चर्चा-विमर्षाच्या, प्रशिक्षणाच्या कार्यक्रमासाठीही वापरतात.
श्रमिक - ठीक. वापर होतो, पण प्राधान्याने कामगार हाच शब्द.
स्वैच्छित - याच पुस्तकातला शब्द. एरवी ऐच्छिक, स्वेच्छा, स्वयंसेवी असेच शब्द.
अवसायन - हा शब्द वापरात आहे. सरकारी पातळीवर, अनेकदा वृत्तपत्रातदेखील. एरवीचे ठाऊक नाही.
एकस्व - हा शब्द क्वचित. त्याऐवजी एकाधिकार, मक्ताधिकार असे शब्द वापरले जातात.
वरकाम - सोपा, वापरात सहजी येईल असा शब्द, तरीही क्वचित वापरला जातो. त्याऐवजी जादा काम हाच उपयोग.
उपबंध - थोडाफार सरकारात टिकलेला शब्द आहे. त्याऐवजी तरतूद असाच अधिक वापरातील शब्द.
अप्रकट - हाही विस्मरणात गेलेला शब्द. चांगला आहे. वापरावयास हरकत नाही.
पटल - संसद, विधिमंडळ यासंदर्भात टिकून आहे. तेथे बहुतांशी एखादी गोष्ट टेबल करणे या अर्थी पटलावर ठेवली असे म्हणतात. वृत्तपत्रातही चमकतो हा शब्द.
पंजीकार - याऐवजी निबंधक असाच शब्द आता आहे.
न्यायपरामर्शक - शब्द मराठी म्हणून ठीक, पण ऍमिकस क्युरीसाठी न्यायमित्र असा एक शब्द आहे. आणखी एक आहे, आत्ता आठवत नाही.
परंतुके - कायद्यांच्या अनुवादात येतो हा शब्द अधूनमधून.
अधिपत्र - फारच क्वचित वापरला जातो. बहुतांशी वॉरंट याच शब्दाचा वापर.
प्रत्यर्पण अधिपत्र - यापैकी प्रत्यर्पण हा शब्द वापरात येतो.
निलंबन - हा शब्द सर्रास वापरात आहे.
पुनरावेदन - हा शब्द क्वचित वापरात येतो, तोही सरकारी पातळीवर आलाच तर.
प्रारूप - हा शब्द वापरतात, पण प्रामुख्याने मसुदा.
कर्तव्य तालिका - यापैकी तालिका हा शब्द विधिमंडळीय भाषेत असतो.
जानपद चिकित्सक - हा या पुस्तकातलाच शब्द आहे. एरवी सिविल सर्जनला जिल्हा शल्यचिकित्सक असाच शब्द वापरला जातो.
कृष्णसूची - छे, काळी यादी.
प्रदेय- छे शुल्क.
मार्गरक्षी - नाही एस्कॉर्टच.
अर्थात, ही सारी माहिती आहे. त्या-त्या शब्दांच्या वापराविषयीचे माझे मत असेच वा भिन्नही असू शकते. सध्याच्या वापराविषयी चर्चा व्हावी एवढ्याच हेतूने हे एवढे टंकन (टंकन म्हणजे टाईप, मग कंपोझला काय म्हणावे?) केले आहे.