'सारे रामायण एका स्त्रीपायी झाले' असे म्हटले जाते.  अर्थात ही स्त्री म्हणजे सीताच अभिप्रेत असते. मला मात्र सीता ही ती स्त्री वाटत नाही. ती स्त्री असेलच तर शूर्पणखा होय.

सहमत / असहमत.

रामायण जिच्यामुळे 'घड'ले ती स्त्री ही सीताही नाही आणि शूर्पणखाही नाही. ती स्त्री म्हणजे वाल्या कोळ्याची बायको. ना ती वाल्याच्या पापांत वाटेकरी व्हायला नाकबूल होती, ना वाल्याचा वाल्मीकी बनता आणि ना मग पुढचे रामायण 'घड'ते. तिने वाल्याच्या पापांत वाटेकरी व्हायला नकार दिला म्हणूनच (भ्रमनिरास होऊन?) त्यातून वाल्या रामायण लिहिण्यास उद्युक्त झाला आणि वाल्याचा वाल्मीकी बनला. ती जर वाल्याच्या पापांत वाटेकरी बनण्यास तयार होती, तर वाल्या आयुष्याच्या अंतापर्यंत वाटमारी करतच राहता, आणि पुढचे रामायण 'घड'ण्यापासून (म्हणजे रचना होण्यापासून) टळते.

एका अर्थी वाल्या कोळ्याची बायको ही रामायणाची खरी हिरॉइन मानली पाहिजे. तिच्या कृतीतून तिने ना केवळ वाल्याला 'घड'वले (वाटमारी करणाऱ्या कोळ्या*पासून महाकवी वगैरे), तर रामायणासारखे एक महाकाव्यही 'घड'वले. (आणि आपली सर्वांची त्यावर वाद घालण्याची त्यातून सोयही 'घड'वली, हे तर तिचे आपल्यावर महाउपकार आहेत.)

त्या आद्य शक्तिमती स्त्रीस माझे लक्ष लक्ष प्रणाम!

*कोळी आणि वाटमारी यांचा नेमका संबंध मला कळलेला नाही. असो.