हा अर्थः

नाजुकी उसके लबकी क्या कहिये
पंखडी इक गुलाबकीसी है

ती खऱ्या अर्थाने माझी जीवनसाथी, माझी प्रेयसी कधी झालीच नाही रे! मी कायम एका 'अपरिचितासारखाच' राहिलो. हे सत्य मी पचवले आहे. पण मीर, काय सांगू रे! कधी कधी तिचे जवळून दर्शन व्हायचे अन तिचे ते नाजूक ओठ मला दिसायचे. अगदी गुलाबाच्या पाकळीसारखे! पण गेला तो जमाना! आता ती दुसऱ्या कुणाची तरी आहे अन मी? मी असाच, फाटका, संपलेला! पण मीर, कधीतरी तिचे ते ओठ आठवतात रे!

मीर उन नीमबाज आखोमे
सारी मस्ती शराबकीसी है

मीर, तू दारू प्यायलास की कसाही वागतोस की नाही? हवे ते बोलतोस, हवे ते मागतोस! अगदी तसेच होते, जेव्हा मी तिचे ते डोळे पाहतो तेव्हा! सगळे भान जाते अन मी पुन्हा तिच्या प्राप्तीचा विषय तिच्यापाशी काढतो. होय, अगदी आजही, इतकी वर्षे झाल्यावरही! अन आजही ती मला पुन्हा भानावर आणते. तिच्या प्राप्तीची शक्यता एका झटक्यात नष्ट करते. आजही तिचे डोळे तसेच, आजही त्यांचा माझ्यावर होणारा परिणाम तोच अन आजही माझे दुःखही तेच! मीर, काय सांगू तुला, इतकेच समजून घे की तिच्या डोळ्यातील जादू मदिरेसारखी आहे. भान आले की सगळे नको वाटते पण शुद्ध गेली की मी पुन्हा तिचीच कामना मरायला लागतो.

( मीर एवढे सगळे कुठे म्हणाला आहे हा प्रश्न उचितच ठरेल! पण माझ्यामते एखाद्याची शायरीचा नीट आस्वाद घ्यायचा असेल तर खरे तर तो शायर माणूस म्हणून कसा आहे हे समजून घ्यावे लागते. लपलेले अर्थ / वाटलेले अर्थ वगैरे चर्चा तेव्हा होते जेव्हा माणूस कसा होता अन त्याने काय भोगले होते हे माहीत नसते तेव्हा! आता हे त्यांच्याबद्दलच शक्य आहे जे सुप्रसिद्ध आहेत. म्हणून माझे मत असे आहे की जो माणूस इतरांना पुरेसा माहीत नसतो त्याच्या कवितेमध्ये जरा 'आवश्यक इतका' स्पष्टपणा तरी यायला हवा. म्हणजे त्याला काय म्हणायचे आहे हे 'एक' स्पष्ट होणे व त्याव्यतिरिक्त इतरांनी अर्थ काढणे हे 'दोन'! सगळेच संदिग्ध ठेवले तर 'मजा येईल' हे खरे आहे, पण मग माणूसही कळत नाही अन ज्याला जे हवे ते तो समजायला लागतो. मी माननीय चक्रपाणी यांच्या 'भूल' या शेरावर इतका वेळ घालवणे याचे एकमेव कारण हे आहे की त्यात मला सच्चेपणा जाणवणे अवघड गेले. )

गालिबचा एक शेर आहेः

डरे क्यो मेरा कातिल क्या उडेगा उसकी गर्दनपर
वो खूं जो चश्मेतरसे उम्रभर यूं दम ब दम निकले

माझ्यावर वार करताना प्रेयसीला याची चिंता का वाटावी की माझे रक्त तिच्या अंगावर उडेल? मुळात तिची प्रतीक्षा करताना सारे रक्त डोळ्यांमधून निघून गेले आहे.

आता गालिबला कुठे कोण मारणार होते? कोण वार करणार होते? त्याच्या डोळ्यातून कुठे रक्त गेले होते? हे प्रश्न मनात येत नाहीत याचे कारण 'गालिब'ची शायरी व तो स्वतः जगप्रसिद्ध आहे. पण समजा मी असा शेर रचलाः

( हा शेर माननीय चक्रपाणी यांनी 'आज तकची बातमी' या शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे )

झाले जगून ज्याचे सोडून जात आहे
मृत्यूस जिंदगी ही अवघी बहाल आहे

मला स्वतःला २००५ मध्ये झालेल्या भीषण अपघातात मला जवळ जवळ मृत्यूची चाहूल लागली होती. छटा दिसली होती. खरे तर माझ्या ८० % कवितांमध्ये मृत्यूचा उल्लेख आहे. पण वरील शेर खरोखरच एखाद्याला बातमी वाटणे किंवा सच्चेपणाचा न वाटणे शक्य आहे. कारण तो मी अल्मोस्ट २ वर्षांपुर्वी रचलेला आहे. तेव्हा माझी मते बनत होती. ही चूक मी मान्य करतो. पण माझ्यापुरते पहाल तर सच्चेपण आहे. अन म्हणुनच मी त्यांना विचारले की भूल या शेरात सुदैव गेले म्हणजे काय झाले? की तो फक्त एक कल्पनाविलास आहे?

धन्यवाद!