लेखमालेतील इतर लेखांप्रमाणेच हाही लेख आवडला.
थोडे "कवठे"बद्दल : प्रसिद्ध लेखक कै. धों. वि. देशपांडे यांनी लिहिलेल्या त्यांच्या "कवठे"वरील लेखामध्ये त्यांनी या कथेमध्ये ऍडम आणि इव्हचे रूपक कसे मांडले आहे - पर्यायाने "कवठ" म्हणजे ज्ञानफळ होय अशा अर्थाचे विवेचन केलेले आठवते.
बाकी काही कथांच्या दिसलेल्या/न दिसलेल्या अर्थांबद्दल : जीएंच्याच काय , कुणाच्याही साहित्याचे अर्थनिर्णयन हा एक फारच व्यक्तिनिष्ठ भाग झाला असे मला वाटते. अर्थनिर्णयन करतानाचे काही मापदंड , काही गाईडलाईन्स आहेत. यापैकी काहींच्या बाबतीत सर्वसामान्यतः एकवाक्यता दिसते : उदा. आयुष्यातल्या सर्व गोष्टींप्रमाणेच फिक्शन मधील व्यक्तीरेखांकडे काळ्या/पांढऱ्या रंगामध्ये पाहू नये , आपले चष्मे काढून ठेवावेत इ. इ. मात्र काही निकषांच्या बाबतीत मतभिन्नता आढळते. उदा. जी एंच्या अनेक (कु)प्रसिद्ध मतांपैकी एक मत म्हणजे : कलाकृतींमधून जे चितारायचे तो वर्ण्यविषय सामाजिक स्वरूपाचा असेल तर ती कलाकृती कनिष्ठ दर्जाचीच. लिखाणातून माणसांच्या मूलभूत प्रश्नांकडे पाहणे होत असल्यास त्या कृतीला काहीतरी अर्थ असण्याची शक्यता. आता , या मतामध्ये अर्थातच दुमत होण्यासारखे पुष्कळ आहेच. तर सांगायचा मुद्दा असा, की , कुठल्याही कलाकृतीचे अर्थनिर्णयन करण्याच्या अनेक शक्यता आहेत. कुणाला एखादा अर्थ दिसतो , कुणाला अनेक अर्थ दिसतात. जितके क्षितीज रुंद तितके नवे प्रदेश दिसणार, जितके तुमच्या कॅमेराचे रेझोल्युशन (मराठी शब्द ?) शक्तीशाली तितके अधिक पदर उलगडणार. अर्थनिर्णयन ही ज्याची त्याची सार्वभौम बाब आहे.