रेल्वेपरीक्षांमध्ये बिहारी लोकाना झुकते माप मिळत असेल तर बाकीच्या राज्यातले लोकही आरडाओरडा का करत नाहीत? अन्याय फक्त मराठी लोकांवरच होतोय का? आणि होत असल्यास परीक्षेला आलेल्या गरीब लोकांना मारहाण केल्याने तो अन्याय कायमचा दूर होईल काय?

दुसऱ्या लोकाना हाणूनमारून ते आपल्या भाषेला आणि संस्कृतीला मान देतील असं मला वाटत नाही. दक्षिण भारतातले लोक परप्रांतीयाना मारत नाहीत, ते फक्त स्वतःच्या भाषेत बोलतात, समोरचा कोणत्याही भाषेत बोलला तरी. तेवढंच आपल्याला करायचं आहे पण तेवढासुद्धा स्वाभिमान मराठी मध्यमवर्गात नाही. पण अस्मितेबाबत बोंब मारण्यात मात्र हाच वर्ग सगळ्यात पुढे असतो. महाराष्ट्रातले नेते वृत्तवाहिन्याना मुलाखती देतानाही (भयंकर) हिंदी बोलतात म्हणून त्याना नावं का ठेवावी? आपण स्वतः टॅक्सीवाल्याशी मराठी बोलतो का? आणि हे बदलण्यासाठी राज ठाकरे कशाला हवेत? परभाषिक कष्टकरी लोकाना मारून पिटाळून लावल्यावर राज ठाकरे त्या बदल्यात काम करणारे मराठी लोक पुरवणार आहेत का?

उद्या अमेरिकेत गेलेल्या मराठी लोकाना तिथे संमेलन भरवले म्हणून कोणी मारले तर? मध्यंतरी म. टा. मध्ये कोणा डोईफोडे नामक व्यक्तीने एका लेखात 'मराठी ब्राह्मण लोक कॅलिफोर्नियाचा कोकण करतील' असं म्हटलं होतं. त्यावरून कोणी त्यांचं डोकं फोडलं तर?

राज ठाकरे जे करत आहेत ते बाळासाहेब ठाकऱ्यांनीही २० वर्षांपुर्वी केलं होतं. मग पुनःपुन्हा ते करायची गरज का पडते आहे? कारण साधं आहे. पोटापाण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागला तरी इतरवेळी आपल्याच भाषेत व्यवहार केले पाहिजेत हे मराठी लोकाना कळत नाही. इंग्रजीचा पुरस्कार करण्यासाठी स्वभाषेचा धिक्कार करायची गरज नाही हे आपल्या समाजधुरीणाना कधीही कळाले नाही. इंग्रजांच्या काळात वाघिणीचे दूध पिऊन ज्यांनी आर्थिक सुबत्ता मिळवली त्यांनी नेहमीच मराठीला तुच्छ समजण्याची चूक केली आणि त्यांचेच अनुकरण इतर समाजाने केले. म्हणून कोणाला मराठीचा खरेच कळवळा असेल तर त्याने आधी मराठी लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. असं मारहाण आणि दंगल करून काहीही होणार नाही. मारायचंच असेल तर मराठी न बोलणाऱ्या मराठी लोकाना मारावं.