नेहमीच घाबरून जाऊ नये. तिथे जर दंड म्हणून " फाशी" लिहिली असती तर तुम्ही हार्टऍटॅकनेच गचकला असतात.
हा हा हा.. छान विनोद केलात. आवडला. मी घाबरून गेलो होतो हे आपण सोयीस्करपणे ठरवून टाकलेले दिसते. मी नेहमीच नियम पाळत असल्याने मला या लोकांशी घासाघीस अथवा त्याना कसलीतरी भीती दाखवून अशा प्रसंगातून सुटका करून घ्यायचा फारसा सराव नाही.
तुम्ही त्याचे हात ओले करताना त्याची वैधानीक पात्रता काय? हे न विचारता, तोच अंतीम निर्णय घेणारा अधीकारी आहे, असे त्याने तुम्हास भासवले. तुम्ही त्याला " तुझ्या साहेबाकडे चल" अशी तंबी द्यायला पाहिजे होते.
मला तमाशा करायचा नव्हता. आणि साहेबाकडे चल आणि पोलिसात जाईन किंवा वरपर्यंत जाईन असं म्हटल्यावर तो लगेच घाबरला असता असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फारच बाळबोध आहात.
विदेशी पर्यटका समोर तुमची / देशाची / संस्कृतीची "इभ्रत जाईल" अशी खोटी भीती तुम्हाला वाटली, त्यामुळे तुम्ही जॉन आला तेंव्हा त्याच्या बुद्धीची वस्तुनिष्ठ मदत नाकारलीत, त्याला गाडीत जाऊन बसण्यास सांगीतलेत. कदाचीत तो अशा परिस्थीतीत जास्त अनुभवी असेल. अपयशाची वाच्यता ऑफिसात होईल अशी देखील भीती तुम्हास त्यावेळी वाटली असेल
तुम्ही फारच कमी माहितीवर निष्कर्ष काढता बुवा. जो मनुष्य शनिवारवाड्याच्या शेजारच्या छोट्या रस्त्यावरची रहदारी पाहून बावरतो आणि रस्ता ओलांडताना घाबरतो तो अशा बाबतीत अनुभवी असेल? आणि जर तो अनुभवी असेल तर इतर ठिकाणचे परदेशी लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार पाहून तो आश्चर्यचकीत झाला नसता. 'अपयशाची वाच्यता' हा प्रकार मला कळाला नाही. या प्रसंगात मी अपयशी झालो असं तुम्हाला वाटते काय? मला तसे वाटत नाही. तसे असते तर मी स्वतःहून कार्यालयात सहकर्मचाऱ्याना हा प्रकार सांगितला नसता आणि असा जाहीरपणे ही मांडला नसता. आणि माझी/देशाची इभ्रत जाईल ही भीती खोटी कशी? की देशाला इभ्रतच नसल्याने ती जाणार नाही असं तुम्हाला वाटतं?
तुम्ही जर त्याचे हात ओले केले नाहीत तर, तो तुमची गाडी घेऊन टाकेल / गाडीचे नुकसान करेल, अशी बाळबोध भीती तुम्हास वाटली. तो असे प्रत्यक्ष काहीच म्हणाला नाही, तुम्हीच असा अनुमान काढलात. तुम्ही त्याला असे म्हणाला असता की जर तू गाडी घेऊन जाऊ दिली नाहीस तर तुझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देईन तर मग कदाचीत तो नरमला असता.
या वाक्यावरून असं वाटतंय की तुम्ही अशा प्रसंगाला कधी तोंड दिलेले नाही. आणि आपण कधीच पोलिस ठाण्यात गेलेला नाहीत असं दिसतय. शिवाय गाडी घेउन जाण्याचा प्रश्न नव्हताच. मला तो कार्यक्रम माझ्या पाहुण्याला दाखवायचा होता आणि तिकीटे काढणे हा माझा प्रथम उद्देश होता ते ही पाहुण्याला या प्रकाराचा मागमूस लागू न देता.
सरते शेवटी जर तुम्ही, कायद्याच्या वरच्या माणसाचे " आप्त, स्वकिय " आहात एव्हढे जरी भासवू शकला असतात तर त्याने कदाचीत तुम्हाला, चुकलो साहेब असे म्हणून सलाम ठोकला असता. अश्या युक्त्या तुमच्याच हापिसातल्या "सेल्स" च्या लोकांना जास्त चांगल्या जमतात, विचारा त्यांना.
हे मला चांगलेच माहिती आहे. माझ्या मित्राने माझ्यासमोर आपली उचलून नेलेली गाडी एका फोनसरशी पोलिसाचाच सलाम घेउन सोडवून आणलेली मी पाहिली आहे. पण तुम्हाला मुद्दा कळाला नाही. असं मोठ्या माणसाचं नाव घ्यावं लागणे किंवा पैसे द्यावे लागणे हे दोन्ही माझ्या दृष्टीने सारखंच घृणास्पद आहे. मुद्दा हा आहे की पैसे मिळवण्यासाठी नको तिथे नियमाचा कसा काटेकोर अंमल केला जातो आणि इतरवेळी मात्र कर्तव्याकडे दुर्लक्ष केले जाते. माझे पैसे गेले म्हणून मी मूर्ख असेन आणि स्ट्रीट स्मार्ट नसेनही कदाचित पण पैसे खाणऱ्यांचं काय? ५ वर्षाचं पोरसुद्धा सांगेल की अशा नियमभंगासाठी १००० रुपये दंड नसतो. मग मी त्याच्या वरिष्ठाला शोधत फिरलो असतो आणि सुदैवाने तो कनवाळू (तुमच्या भाषेत) निघाला असता आणि त्याने माझ्याकडून दंडाची योग्य ती रक्कम घेतली असती तरी फरक काय पडला असता? त्या तिकीटवाल्याला चांगलं माहिती होतं की आम्ही शो पाहायलाच आलो आहोत आणि आम्ही बाहेर जाउन पाणी घेऊन आलो हे आमच्या हातातल्या बाटल्यांवरून आणि जितक्या वेळात आम्ही परतलो त्यावरून समजतच होतं. पण त्याला पैसे खायचेच होते आणि परदेशी माणसासमोर मी ताणून धरणार नाही हे त्याला माहितीच होतं.
असो. तुमच्या सल्ल्यांबद्दल धन्यवाद. पण पैसे कसे वाचवायला पाहिजे होते आणि अशा प्रसंगाना कसं तोंड द्यावं हे विचारण्यासाठी मी अनुभव लिहिला नव्हता. आणि ३०० रुपये गेले म्हणून मी विमनस्क झालो नाही तर ती वृत्ती पाहून मी विमनस्क झालो. १० मिनिटात त्या माणसाच्या डोक्यात लगेच कसा लुबाडायचा डाव शिजला. त्याला खरोखरच नियमाची चाड असती तर त्याने त्याच्या समोरून जातानाच इशारा दिला असता. शिवाय तांत्रिक दृष्ट्या चालक गाडीतच असल्याने आम्ही गाडी सोडून गेलो असं होत नाही.
तुमचे विचार वाचून एवढं मात्र कळलं की तुम्हाला पैसे खाण्याच्या वृत्तीबद्दल काहीच वाटत नाही आणि ही प्रवृत्ती नष्ट कशी होईल याचा विचार करण्यापेक्षा फक्त प्रासंगिक विचार करण्याएवढाच स्मार्टनेस तुमच्यात आहे.