उखाणे घ्यायला लावणे यात पतीचे नाव घेताना पत्नीला 'लाज' वाटणे ( चांगल्या अर्थाने लाज वाटणे ) हे मूलभूत कारण असायचे. हल्ली अश्या लाजाळू स्त्रिया सत्तरीच्या घरात पोहोचल्या आहेत. त्या लाजल्या तरी जगाला फारसा फरक पडत नाही. ही लज्जा नामक गोष्ट निवृत्त होत असल्यामुळे उखाण्यांना व्ही आर एस घ्यावी लागत आहे.
उखाण्यांबरोबरच इश्य, अय्या वगैरे शब्दांना आता रिट्रेंचमेंट लागू होत आहे. हल्ली 'इश्य' म्हणण्याची परिस्थिती उद्भवत नाही असे नाही. पण आता 'इश्य' म्हंटले जात नसावे. कदाचित 'वॉव्ह' म्हणत असावेत. किंवा काहीच म्हंटले जात नसावे. किंवा ती परिस्थिती 'इश्य' म्हणणारेच निर्माण करत असावेत.
परवा एक स्त्री स्वतःच्या पतीचे नाव घेताना अजिबात लाजली नाही हे आम्ही पाहिले. नवरा मात्र आपले नाव घेतलेले पाहून बिचकल्यासारखा वावरत होता. नंतर तीच स्त्री एका भलत्याच माणसाला हाक मारताना अगदी पुर्वीच्या स्त्रीयांसारखी लाजली. तोही फुशारल्याप्रमाणे इकडे तिकडे वावरू लागला.
मी एका पुस्तकात वाचले होतेः
" आमच्या आईच्या तोंडून भरदुपारी एक पूर्ण वाक्य बाहेर पडलेले पाहून बाबा चकीत झाले व तिला झोपाळ्यावर बसवून म्हणाले ... बोल.. तुला काय हवे ते माग"
आज जर एखादी विवाहीत स्त्री दिवसभारत एकही पूर्ण वाक्य बोलली नाही तर ( शक्य असल्यास ) पती तिला झोपाळ्यावर बसून विचारेल की बाईग, सांग तुला काय हवे आहे? ( शक्य असल्यास म्हणजे झोपाळा असल्यास नव्हे, बसवणे शक्य असल्यास )
तेव्हा आमचे काही काळाशी निगडीत असणारे उखाणेः
सुभाष बघतो, विकास हसतो, समीर मारे हाका
मला घराला आणता आणता .... रावांना लागी धापा
निवडत होते गहू, म्हणाले .... रावांना जरा पडा
नाव घेतले त्यांचे आणि गव्हात आला खडा
धन्यवाद!