राम धोरणी राजकारणी डोक्याचा होता आणि आयत्याच चालून आलेल्या कोणत्याही संधीचा राजकीय दृष्टीकोनातून पूर्ण विचार करून जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचं कसब त्याला चांगलंच अवगत होतं असं म्हणावं लागेल.

१. भरताने राजा व्हावं हा कैकेयीचा दुसरा वर मान्य झाला असता तर दशरथाची वचनपूर्ती झाली असती हा श्रीकांत जोशींचा मुद्दा योग्य आहे. याबाबतीत जरी भरताने स्वतःच राजा होण्यास नकार दिला असला तरी, "वडिलांच्या वचनपूर्तिसाठी निदान चौदा वर्षे तू राजा व्हायला हवेस" या आपल्या म्हणण्याचा पुरेसा हट्ट धरून आपला 'भक्त' असलेल्या भरताला राजा व्हायला लावणं रामाला अवघड नव्हतं. पण  कैकेयीच्या कृत्याने संतापलेला, अपराधी वाटत असलेला भरत आज राज्य नाकारत असला तरी चौदा वर्षांनी कदाचित सिंहासनावरून पायउतार होणार नाही याची जाणीव रामाला होती. तसे झाले असते असते तर ज्येष्ठ पुत्र असूनही आपला राज्याचा हक्क डावलला जाऊन मानहानीचा / युद्धाचा प्रसंग ओढवेल याचा त्याला अंदाज होता. हे सारे टाळायचे तर भरत स्वेच्छेने राज्य नाकारत असल्याच्या संधीचा लाभ आत्ताच घेतला पाहिजे हे रामाला चांगलंच दिसत होतं. म्हणूनच सर्वांसमोर आदर्श भावाचा एक मान भरताला देऊन, पादुका देऊन, त्याला आपला प्रतिनिधी म्हणून राज्य सांभाळू देणे हा राजकीय विजय रामाने प्राप्त केला. चौदा वर्षांनंतर आपणच न्याय्य राजा असू अशी जाहिरात तिथेच त्याने केली! शिवाय या प्रसंगाने रामावर अन्याय झालाय ही प्रजाजनांना वाटणारी खंतही अधिक गडद करून घेता आली!

२. वाली अधिक बलवान होता, त्याने रावणाला दोनदा पळवून लावले होते ही गोष्ट रामाला चांगलीच माहित होती. पण त्यासाठी वालीची मदत घेतली असती तर वालीला मोठेपणा मिळाला असता, रामाला कमीपणा आला असता. शिवाय असा पराक्रमी बलवान राजा रावणाला हरवल्यानंतर रामासारख्या दूर कुठल्यातरी राज्याचा राजा असलेल्या माणसाचा अंकित होऊन राहिला असता का? नक्कीच नाही. उलट त्याने रामाला आपल्या अंकित करून घेण्याचा प्रयत्न केला असता. तो स्वतंत्र झाला असता आणि त्याने डोके वर काढून "रामराज्या"ला वात आणला असता. सुग्रीवाची तेवढी ताकद नव्हती, शिवाय वालीला मारायला रामाची मदत सुग्रीवाने घेतल्यामुळे रामाला मोठेपणा आला आणि सुग्रीवाला कमीपणा आला. त्यामुळे तो रामाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबला जाऊन पुढेही रामाचा अंकित राहील हे सरळ होते. त्याचा फायदा रामाने घेतला आणि वाममार्गाने का होईना पण वालीचा काटा काढला. त्यात त्याचा स्वार्थ होता तो हा! (हे मत आधी कुठेतरी प्रतिसादात आलं आहे असं वाटतंय. पण ते सापडत नाहीये. ते मांडणाऱ्याशी सहमती दाखवण्यासाठी पुन्हा मांडलंय असं समजा.)

३. बिभीषणाच्या बाबतीतही तेच.

अयोध्येचा राजा सगळे सोडून लंकेच्या गादीवर बसणार नाही याची विभीषणाला पूर्ण खात्री असणार आणि आपण त्याला जाऊन मिळालो तर लंकेची गादी आपलीच याचीही पूर्ण कल्पना विभीषणाला असणार. त्यामुळे विभीषणाने रामभक्तीपोटी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी रामाची बाजू घेतली आहे. रावणाचे कच्चे-पक्के दुवे ठाऊक व्हावेत यासाठी रामानेही त्याला आपल्या बाजूला येऊ दिले.  हे राजकारण रामाकडून आणि विभीषणाकडूनही. माझ्यामते त्यात गैर असे काही नाही. मात्र नंतर त्याला उगाचच भक्तीचा मुलामा का चढवला गेला समजत नाही.

याच शब्दांत निखिलशी सहमत.

४. सीतात्याग करूनही व्यक्ती म्हणून आणि राजा म्हणून त्याने स्वतःचा फायदा करून घेतला आहेच. आधीच उमेदीचे वय सरल्यावर राम राजा झाला. त्यात सीतेबाबत लोकापवाद निर्माण झाला, त्याचा फायदा घेऊन आपल्या मनातील संशयाला तर त्याने वाट मोकळी करून दिलीच पण त्यासोबतच हा लोकापवाद सहज पसरत गेला असता आणि कदाचित त्याला राजपद सोडावं लागलं असतं / किंवा अंतर्गत उठावांना तोंड देत बसावं लागलं असतं. की त्याचा फायदा बाहेरच्या शत्रूंनी घेतला असता. आणि रामाला "रामराज्य" करणं, टिकवणं कठीण होऊन बसलं असतं. सीतेचा त्याग केल्यानं "राजा" म्हणून आपण किती कर्तव्यक्ठोर आहोत, आपले व्यक्तिगत आयुष्य प्रजासुखापुढे कःपदार्थ आहे हे प्रजेच्या मनावर कायमचं बिंबवून टाकलं, मर्यादापुरुषोत्तम म्हणून ख्याती कमावली. एका दृष्टीने सीतेवर त्याने उपकारच केले असं म्हणावं लागेल, कारण रामानं तिचा स्वीकार केला तर लोक तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होते. मात्र त्याने तिचा त्याग केल्यावर "हिच्यावर अन्याय झाला" अशी सहानुभूती तिला खूप मोठ्या प्रमाणात मिळाली आणि तिच्यावरचा कलंक कायमचा मिटला! तीही शुद्ध पतिव्रता ठरली.

लोकापवाद निर्माण झाल्यावर रामानं अगदी कितीही आग्रहानं त्याचा प्रतीकार केला असता, सीता शुद्ध आहे असा कंठशोष केला असता, अगदी दुसरी अग्निपरीक्षा झाली असती तरी लोकमत कायमचंच कलुषित झालं असतं. त्यामुळे असंही त्यांच वैवाहिक, कौटुंबिक जीवन सुरळीत चालू राहणं अशक्यच होतं. मग त्या जीवनाचा बळी पूर्णपणे देऊन टाकून व्यक्ती म्हणून दोघांच्या आणि राजा म्हणून स्वतःच्या प्रतिमेवरील कलंक दूर करणं हे अधिक शहाणपणाचं धोरण होतं. त्याप्रमाणे ते स्वीकारून रामाने स्वतःसाठी आणि सीतेसाठी एक प्रकारे "विन विन सिच्युएशन"च निर्माण केली असं मला वाटतं.

रामाने घेतलेला यातला कोणताही निर्णय योग्य का अयोग्य ह्या वादात शिरत नाही. पण तो प्रत्येक निर्णय आपलं स्वतःचं राज्य मिळवणे, टिकवणे या विजिगिषू वृत्तिच्या राजाच्या मुख्य उद्दिष्टाला धरून घेतलेला होता, आणि त्या दृष्टीने ते सगळेच निर्णय अत्यंत प्रभावी, यशस्वी होते हे निश्चित.